लोणी काळभोर, ता. ३० : “तू काल आमच्या मित्र ओमच्या घरी का गेला होतास?” असा जाब विचारत एका १९ वर्षीय तरुणाला फोन करून बोलावून घेत प्लास्टिकच्या पाईपने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना कुंजीरवाडी परिसरात घडली. या प्रकरणी दोन जणांविरुद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शुभम चौधरी (पूर्ण नाव व पत्ता अपूर्ण) आणि त्याच्या एका अनोळखी साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी हर्षवर्धन सखाराम वाघमारे (वय १९, रा. दत्तनगर, म्हातोबाची आळंदी, ता. हवेली) यांनी फिर्याद दिली आहे. जखमी हर्षवर्धन यांच्यावर विश्वराज रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्षवर्धन वाघमारे यांचा म्हातोबाची आळंदी येथे नर्सरीचा व्यवसाय आहे. २८ जून रोजी ते मित्र प्रणव मोटे याच्यासोबत कुंजीरवाडी येथे गेले होते. त्यावेळी प्रणव आणि त्याचे काही मित्र एका ओम नावाच्या युवकाच्या घरी गेले होते. तेथे पूर्वी झालेल्या वादाबाबत चर्चा करून समजूत काढण्यात आली. या घटनेशी आपला कोणताही संबंध नसल्याचे हर्षवर्धन यांनी पोलिसांना सांगितले आहे.
दुसऱ्या दिवशी, २९ जून रोजी सायंकाळी सुमारे पाचच्या सुमारास शुभम चौधरी याने हर्षवर्धन याला फोन करून कुंजीरवाडी येथील कॅनॉलजवळ बोलावले. तेथून त्याला विश्व हॉटेलसमोरील खलसे यांच्या गोठ्याजवळ नेण्यात आले. तेथे शुभमचा एक अनोळखी साथीदार आधीपासून थांबलेला होता.तेथे पोहोचताच अनोळखी व्यक्तीने कोणतीही चर्चा न करता प्लास्टिकच्या पाईपने मारहाण करण्यास सुरुवात केली. “तू काल ओमच्या घरी का गेला होतास?” असा जाब विचारत शुभम चौधरी यानेही हातातील पाईपने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
हर्षवर्धन यांनी आपण केवळ मित्रांसोबत गेलो होतो, त्यापलीकडे आपला कोणताही संबंध नसल्याचे सांगूनही आरोपींनी मारहाण सुरूच ठेवल्याचे फिर्यादीत नमूद आहे. अखेर त्यांच्या तावडीतून सुटका करून त्यांनी घरी धाव घेतली. त्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना उपचारासाठी विश्वराज रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयाकडून वैद्यकीय कायदेशीर प्रकरणाची (एमएलसी) माहिती लोणी काळभोर पोलिसांना देण्यात आल्यानंतर पोलिसांनी रुग्णालयात जाऊन जबाब नोंदवला. या प्रकरणी शुभम चौधरी (पूर्ण नाव व पत्ता अपूर्ण) आणि त्याच्या एका अनोळखी साथीदाराविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, लोणी काळभोर पोलीस पुढील तपास करीत आहेत.







