पुणे : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा जोर आता कमी झाला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कमी दाबाची प्रणाली कमजोर झाल्यामुळे पावसाने बहुतांश भागांत उघडीप दिली आहे. तरीही आज काही विशिष्ट जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

हवामान विभागाच्या अंदाजनुसार,रायगड, रत्नागिरी या किनारपट्टीच्या जिल्ह्यांसह पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर मुसळधार सरी कोसळण्याची शक्यता आहे.तसेच अकोला, वाशीम, अमरावती, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पाऊस होऊ शकतो. या सर्व भागांसाठी हवामान विभागाने सतर्कतेचा ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे.

राज्याच्या इतर भागांत ऊन आणि सावल्यांच्या खेळासोबतच हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी अपेक्षित आहेत.आग्नेय राजस्थान आणि लगतच्या परिसरावर तयार झालेले ठळक कमी दाबाचे क्षेत्र वायव्येकडे सरकत असून, ते लवकरच निवळण्याची शक्यता आहे. याशिवाय, दक्षिण गुजरातपासून उत्तर केरळ किनारपट्टीपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा अजूनही कायम आहे.
दरम्यान घाटमाथ्यावरील ताम्हिणी क्षेत्रात तब्बल 280 mm पावसाची नोंद झाली आहे.एकंदरीत, राज्यावरील पावसाचे सावट सध्या हलके झाले असले, तरी नागरिकांनी आणि प्रवाशांनी घाटमाथा तसेच विदर्भातील हवामानाचा अंदाज घेऊनच बाहेर पडणे सोयीचे ठरेल.






