पुणे : पुणे रेल्वे स्थानकावर पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण आणि सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक दुरुस्तीची कामे करण्यासाठी आज (2 ऑगस्ट) नऊ तासांचा विशेष मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.त्यामुळे आता आज सुट्टीच्या दिवशी प्रवाशांना मोठा फटका बसणार आहे.

मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हा ब्लॉक सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत लागू राहणार आहे.या काळात यार्डातील ट्रॅक बदलणे, सिग्नल यंत्रणा सुधारणे आणि ओव्हरहेड उपकरणांची देखभाल यांसारखी महत्त्वाची कामे पूर्ण केली जाणार आहेत.

या मेगा ब्लॉकमुळे पुणे स्टेशनवरील रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम होणार आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 सह यार्डकडे जाणारे मुख्य मार्ग बंद राहणार असल्याने अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या थांब्यात बदल करण्यात आला आहे. प्रवाशांची सोय म्हणून काही गाड्या पुणे स्थानकाऐवजी खडकी, शिवाजीनगर आणि हडपसर स्थानकांवरून सोडल्या जातील किंवा तिथेच थांबवल्या जातील.
रद्द करण्यात आलेल्या प्रमुख गाड्या: पुणे – तळेगाव – पुणे लोकल
पुणे – लोणावळा – शिवाजीनगर लोकल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) – पुणे – CSMT एक्स्प्रेस, पुणे – दौंड डेमू
रेल्वे प्रशासनाने या कामांमुळे प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. रेल्वे मार्ग आणि सिग्नल यंत्रणा अधिक सुरक्षित व सक्षम करण्यासाठी ही कामे अत्यंत गरजेची असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.






