ठाणे: मानपाडा परिसरातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे विभागप्रमुख प्रदीप उर्फ बाळू पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणाचा तपास आता वेगाने पुढे जात आहे. 29 सप्टेंबर रोजी पूर्णेकर यांच्यावर त्यांच्या कार्यालयात गोळीबार करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत काही संशयितांना अटक केली असून, हत्येचा नेमका हेतू आणि कटामागील इतर व्यक्तींचा शोध सुरू आहे. तपासासाठी विशेष तपास पथकाचीही स्थापना करण्यात आली आहे.

दरम्यान, पूर्णेकर यांचा मुलगा राम यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात हत्येमागे राजकीय वैमनस्य असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. मात्र, मीनाक्षी शिंदे यांनी हे आरोप फेटाळून लावत तपासातून सत्य समोर यावे, अशी भूमिका मांडली आहे.

दरम्यान, या प्रकरणात आता एका तरुणीचा उल्लेखही समोर आला आहे. मुलगा राम यांच्या म्हणण्यानुसार, हत्येच्या काही दिवस आधी पूर्णेकर यांनी एका खोलीत एका तरुणीसह दोन तरुणांना पकडले होते. त्यानंतर त्यांनी संबंधित व्यक्तींना पोलिसांच्या ताब्यात दिल्याचा दावा करण्यात आला आहे. हीच तरुणी हत्येच्या आधी आणि नंतर कार्यालयाच्या परिसरात दिसल्याचा दावा करत तिची चौकशी करण्याची मागणी राम यांनी केली आहे. या दाव्यांची पोलिसांकडून पडताळणी सुरू आहे.

मीनाक्षी शिंदे यांनी या मुद्द्यावरही प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, राम यांनी आपल्या जबाबात संबंधित तरुणीचा उल्लेख केला असून तिचे ड्रग्जशी संबंधित असल्याचे सांगितले आहे. पूर्णेकर यांनी तिच्या घरी जाऊन मारहाण केल्याचा आणि त्यावेळी तिने धमकी दिल्याचा दावा शिंदे यांनी केला आहे. त्यामुळे या घटनेचाही तपास व्हावा, अशी त्यांची भूमिका आहे.
दरम्यान, हत्येप्रकरणी निखिल यादव आणि नितेश पवार यांना अटक करण्यात आली असून पप्या शिंदे यालाही यापूर्वी अटक झाली आहे. हत्येचा कट, संभाव्य राजकीय वाद आणि इतर संशयित व्यक्तींची भूमिका याबाबत SIT तपास करत आहे.






