दौंड, (पुणे) : दौंड शहरातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रेल्वेच्या एका वरिष्ठ सहाय्यक लोको पायलटने एका तरूणीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केला. एवढंच नाही तर या तरूणीला कोंडून मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात रेल्वेच्या वरिष्ठ सहायक लोको पायलट विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी दौंड पोलिस ठाण्यात २९ सप्टेंबर रोजी तरुणीने फिर्याद दिली आहे. त्यानुसार विकासकुमार पंथी याच्याविरूध्द भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ६४ (बलात्कार), कलम ६९ (लग्नाचे खोटे वचन देऊन लैंगिक समागम करणे), कलम १२७ (२) (चुकीच्या पद्धतीने बंदिस्त ठेवणे) व कलम ११५ (२) (इच्छापूर्वक दुखापत करणे) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विकास कोमलकुमार पंथी ( वय- ३७, रा. ओम शांती अपार्टमेंट, गजानन सोसायटी, दौंड) असं गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकास पंथी हे दौंड रेल्वे स्थानकात वरिष्ठ सहायक लोको पायलट या पदावर कार्यरत आहेत. या ठिकाणीच सदर तरुणी कंत्राटी पध्दतीवर काम करत आहे. यावेळी पंथी आणि या तरूणीशी परिचय झाला होता. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून विकासने सदर तरूणीला चौफुला (ता. दौंड) ओयो लॉज आणि दौंड-पाटस रस्त्यावरील मनिषा लॉज येथे वेळोवेळी नेत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. धक्कादायक बाब म्हणजे त्याचे चित्रीकरण केले.
आरोपी विकास याचे लग्न झाल्याची माहिती तरुणीला मिळाली. त्यानंतर तरूणीने त्याला जाब विचारला असता विकासने तरूणीला दमदाटी केली. त्यानंतर तिला एका सदनिकेत बोलावून तेथे कोंडून बेदम मारहाण केली. दरम्यान, पत्नीला घटस्फोट देणार असल्याचे सांगत त्याने पुन्हा संपर्क साधत तरूणीला सदनिकेत बोलावून पत्नीच्या समोर तरूणीच्या मोबाइल संचातील छायाचित्रे व झालेला संवाद नष्ट केला.
त्यानंतर दौंड येथून सोलापूर येथे बदली झाल्यावर लग्न करण्याचे आमिष दाखवून आरोपीने तरूणीला पुण्यातील एका मुलींच्या वसतीगृहात दाखल केले. त्यानंतर आरोपीने लग्नास नकार देत संपर्क तोडला. यानंतर तरूणीने दौंड पोलिस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली आहे. दरम्यान, सदर गुन्हा हा यवत (ता. दौंड) पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला असल्याने पुढील तपासाकरिता यवत पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक गोपाळ पवार यांनी दिली.