सारोळा : सावकाराच्या जाचाला कंटाळून मोरवाडी गावातील एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना नुकतीच घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भोर तालुक्यातील मोरवाडी गावातील दीपक रमेश मोरे (वय ३३) या तरुणाने चार सावकारांकडून पैसे घेतले होते.
तरुणाने सावकारांकडून घेतलेल्या पैशांपेक्षा दोन पटीने पैसे दिलेले असतानाही संबंधित सावकारांनी वेळोवेळी तगादा लावून, दमबाजी करून एक दिवस अगोदर मारहाण देखील केली होती. ‘तू मर नाहीतर काही कर, आम्हाला पैसे आणून दे’, म्हणत तरुणाला मारहाण केली होती. कुटुंबियांना जीवे मारण्याची देखील धमकी दिली गेली.
या पाच सावकारांच्या जाचाला कंटाळून या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. परंतु आत्महत्या होऊन तीन दिवस झाले तरी अजून गुन्हा दाखल झालेला नाही. आमच्या मुलाने आत्महत्या केली नसून, एक दिवस आगोदर या तरुणाला मारहाण करून त्या सावकारांनी आत्महत्येस प्रवृत्त केले आहे. पोलीस देखील गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ करत असून, पोलिसच त्यांची पाठराखण करत असल्याचा आरोप तरुणाच्या कुटुंबीयांनी केला आहे.
भोर तालुक्याच्या ग्रामीण भागात खासगी सावकारांनी बस्तान बसविले आहे. या सावकारांच्या पठाणी वसुलीला कंटाळून अनेक जण गाव सोडून गेले आहेत, तर काहींनी आपली घरेदारे विकली आहेत. अशा घटना घडू नये म्हणून खासगी सावकारांवर पोलिसांनी तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.