राहुलकुमार अवचट

यवत: दौंड तालुक्यातील यवत येथील ग्रामस्थांनी आज रविवार दि. २ ऑगस्ट रोजी अनेक वर्षाची परंपरा जपत संपूर्ण गाव बंद ठेवून गावच्या बाहेर जाऊन वनभोजनाचा आनंद लुटला. यवत ग्रामस्थ हे दरवर्षी शेकडो वर्षांची परंपरा जपत आषाढ महिन्यात एक दिवस संपूर्ण गाव बंद ठेवून गावच्या शिवेबाहेर जात वनभोजनाचा आनंद लुटत असतात त्यानुसार पौर्णिमा झाल्यानंतर येणाऱ्या पहिल्या रविवारी वनभोजनाच कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.

पुणे-सोलापूर महामार्गावरील सुमारे २५ हजार पेक्षा अधिक लोकसंख्येचे यवत हे गाव आहे, गावातूनच राष्ट्रीय महामार्ग जात असून जवळच पुणे शहर असल्याने गावाचे वेगाने शहरीकरण होत आहे परंतु हे असूनही यवतकरांनी वानभोजनाची प्राचीन परंपरा आजही जपली आहे.
आज सकाळी ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ व ग्रामदेवी श्री महालक्ष्मी मातेस नैवेद्य नारळ करून आरती करण्यात आली व संपूर्ण गावातील रहिवाशी , व्यापारी घराला व दुकानांना कुलूप लावून वनभोजनासाठी गावाबाहेर पडले.
गावातील हॉटेल, किराणा, तसेच सर्व दुकानदारांनी दुकाने उत्फूर्तपणे बंद ठेवली होती. रविवार असल्याने बँका, शाळा, सरकारी कार्यालयांना सुट्टी होती. त्यामुळे गावात शुकशुकाट पाहायला मिळाला. गावात येणाऱ्या बाहेरील लोकांना गावात प्रवेश मिळू नये यासाठी सर्व रस्त्यांवर दोरी लावून वाहनांना प्रवेश नाकारण्यात आला होता. बाहेरील नागरिकांना गाव बंद असल्याचे सांगितल्यावर या परंपरेबद्दल त्यांचे कुतूहल व्यक्त करत होते.
यावेळी गावातील नागरिक गावच्या शिवेवर, जवळच्या शेतात सोयीनुसार समूहाने जाऊन गोडधोड जेवण केले व वनभोजनाचा आनंद लुटला तर गावातील तरुणाही शिर्डी, प्रति बालाजी, नारायणपूर, भुलेश्वर आदी धार्मिक स्थळी दर्शनासाठी तर काही जण माळशेज घाट, कास पठार, खडकवासला आदी परिसरात पावसाचा आनंद घेण्यासाठी गेले होते, सायंकाळी ५ च्या सुमारास ग्रामस्थ घरी परतले व पुन्हा दैनंदिन व्यवहार सुरू झाली.
गाव बंद व चतुर्थी असल्याने आखाड यात्रा झाली नाही
आषाढ महिना सुरू असल्याने दरवर्षी आषाढ यात्रा करण्यासाठी अनेक भागातील भाविक यवत येथील श्री महालक्ष्मी मंदिर येथे येत असतात यानिमित्ताने देवीची आकर्षक सजावट करण्यात आली जाते परंतु आज संकष्टी चतुर्थी व गाव बंद असल्याने अनेक यात्रेकरूंनी आपली यात्रा साजरी न करण्याचा निर्णय घेतल्याचे चित्र पहायला मिळाले .







