पुणे : विधान परिषदेच्या सदस्या डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या शिवाजीनगरमधील निवासस्थानात एका तरुणाने प्रवेश केल्याची घटना समोर आली आहे. शनिवारी सकाळी सव्वासहाच्या सुमारास मॉडेल कॉलनीतील त्यांच्या बंगल्यात एक तरुण शिरल्याचे सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. पोलिस कर्मचारी आणि सुरक्षारक्षकांनी त्याला ताब्यात घेतले. हिमांशु निवृत्ती हिरे (वय २१, रा. सटाणा, जि. नाशिक) असे त्याचे नाव असून, त्याच्याविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी केलेल्या तपासणीत हिमांशुच्या पिशवीत हातोडा, पक्कड, हातमोजे आणि सुमारे दहा मीटर लांबीची दोरी आढळून आली. तसेच निवासस्थानात प्रवेश केल्यानंतर त्याने पाण्याच्या टाकीचा नळजोड बंद केल्याचे समोर आले आहे. त्याच्याकडे वेगवेगळ्या नावांची ओळखपत्रेही सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे तो नेमका कोणत्या कारणासाठी बंगल्यात शिरला होता आणि त्याची खरी ओळख काय आहे, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

दरम्यान, हिमांशुच्या आईने आपल्या मुलाचा कोणताही गैरहेतू नसल्याचा दावा केला आहे. शिक्षणासाठी तो पुण्यात आला असून काही कारणांमुळे तो मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असावा, असे त्यांनी सांगितले. मित्र-मैत्रिणी किंवा अभ्यासाशी संबंधित कारणांमुळे तो अस्वस्थ झाल्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली. चोरी करण्याचा उद्देश असता तर तो तेथे थांबला नसता, असा दावा करत तो केवळ तेथे जाऊन झोपला होता, असे त्याच्या आईने म्हटले आहे.

आपल्या मुलाने यापूर्वी अशा प्रकारचे कोणतेही कृत्य केले नसल्याचे सांगत त्याची पार्श्वभूमी तपासावी, अशी विनंतीही त्यांनी केली. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आई म्हणून आपल्या मुलाचा विचार करावा आणि आपले म्हणणे ऐकून घ्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. मुलाला कोणतीही इजा करण्याचा किंवा नुकसान करण्याचा उद्देश नव्हता, असा दावाही त्यांनी केला.
या घटनेबाबत डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी आपण नेहमी मदतीची भूमिका घेतली असून, संबंधित तरुणाने आपल्याकडे भेटीसाठी वेळ मागितल्याचेही आपल्याला माहिती नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. तरुणाकडे सापडलेल्या वस्तू आणि पाण्याचे कनेक्शन बंद केल्याच्या घटनेचा उल्लेख करत, तो नेमका कोणत्या उद्देशाने निवासस्थानी आला होता, हा महत्त्वाचा प्रश्न असल्याचे गोऱ्हे यांनी म्हटले आहे.







