शिरूर: पुणे जिल्ह्यातील शिरूर शहरात हॉटेलच्या जागेच्या जुन्या वादातून मोठा राडा झाल्याची घटना समोर आली आहे. बायपास रोडवरील पाषाणमळा परिसरातील ‘जयशंकर स्नॅक्स सेंटर’मध्ये काही जणांनी घुसून तोडफोड केल्याचा आरोप आहे. या घटनेत हॉटेलमधील कर्मचारी आणि महिलांना मारहाण करण्यात आली. तसेच गरम चहा अंगावर फेकून काही जणांना जखमी केल्याचेही फिर्यादीत नमूद करण्या त आले आहे.

या घटनेनंतर शिरूर पोलीस ठाण्यात 3 महिलांसह 7 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात संपूर्ण प्रकार रेकॉर्ड झाला असून, पोलिसांनी हे फुटेज तपासासाठी ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हॉटेलच्या जागेवरून संबंधित पक्षांमध्ये यापूर्वीपासून वाद सुरू होता. याच वादातून आरोपी हॉटेलमध्ये आले आणि त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केल्याचा आरोप आहे. यावेळी हॉटेलमधील टेबल, खुर्च्या, काउंटर तसेच पाण्याचे बॉक्स यांचे नुकसान करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

फिर्यादीत महिलांच्या अंगावरील सोन्याचे दागिने जबरदस्तीने काढून घेतल्याचाही आरोप करण्यात आला आहे. हाणामारी सुरू असताना हॉटेलमध्ये असलेला गरम चहा काही जणांच्या अंगावर फेकण्यात आला. त्यामुळे त्यांना भाजल्याच्या जखमा झाल्या. जखमींना उपचारासाठी शिरूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच शिरूर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे तपास सुरू केला आहे. या प्रकरणात हत्येचा प्रयत्न, तोडफोड, जबरी चोरी यांसह विविध कलमांनुसार कारवाई करण्यात आली आहे.







