वाघोली, ता. 29 : घरासमोर येऊन ‘आता तुला सोडणार नाही, आम्ही चौघे भाई आहोत’, अशी धमकी देत धारदार लोखंडी हत्यारे हवेत फिरवून दहशत निर्माण केल्याची घटना घडली आहे. हि घटना वाघोलीतील केसनंद फाटा परिसरात 26 सप्टेंबर रोजी दुपारी सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. आहे. याप्रकरणी ईश्वर विष्णू कापसे (वय 34) यांनी वाघोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, हरी, रोहित, बंटी आणि कुंदन (पूर्ण नाव-पत्ता माहीत नाही) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार कापसे हे केसनंद फाटा येथील भारत पेट्रोल पंपासमोरील मोकळ्या जागेत कुटुंबासह राहतात. ते हमाली तसेच घर शिफ्टिंगचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. कापसे हे घरी जेवण करीत असताना त्यांच्या घरासमोर दोन दुचाकींवरून चार जण आले. या दुचाकींमधून सायलेन्सरचे मोठे आवाज करत फटाके फोडल्यासारखा आवाज करण्यात आला. त्यानंतर कापसे यांच्या पत्नीने बाहेर जाऊन पाहिले असता चार जण आल्याचे दिसले.
कापसे बाहेर आल्यानंतर संशयितांपैकी कुंदन याने रोहितला, ‘तुझ्या बायकोला कोण बोलले?’ अशी विचारणा केली. त्यानंतर रोहितने कापसे यांनी आपल्या पत्नीला काही सांगून भडकावल्याचा आरोप करत त्यांच्याशी वाद घातला. यावेळी कुंदन याने दुचाकीच्या डिक्कीतून दोन धारदार लोखंडी हत्यारे बाहेर काढून त्यापैकी एक साथीदार हरी याच्याकडे दिले, असा आरोप आहे. त्यानंतर चौघांनी कापसे यांना शिवीगाळ करून ‘आता तुला सोडणार नाही, आम्ही चौघे भाई आहोत’, अशी धमकी दिली.

दरम्यान, संशयितांनी हातातील धारदार हत्यारे हवेत फिरवत परिसरात दहशत निर्माण केली. त्यामुळे शेजारी राहणारे नागरिक घाबरून तेथून पळून गेले. संशयित जवळ येत असल्याने कापसे हे भीतीपोटी तेथून पळून गेल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. या घटनेनंतर रात्री कापसे यांनी वाघोली पोलीस ठाण्यात धाव घेत चौघांविरुद्ध कायदेशीर कारवाईची मागणी केली. घटनेमागील नेमके कारण, संशयितांची ओळख आणि हत्यारांचा वापर याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.








