खराडी, ता. 29 : मसाज स्पाच्या नावाखाली देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखा युनिट-7 ने खराडीतील ‘वेल बॉडी स्पा’वर सोमवारी (ता.28) सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास छापा टाकला. या छाप्यात एका 25 वर्षीय महिलेची सुटका केली आहे. तर 3 हजार 500 रुपयांची रोकड, चार मोबाईल फोन आणि दोन लॅपटॉप असा एकूण 81 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. स्पा मॅनेजर राजू (पूर्ण नाव माहीत नाही) आणि मालक शाहरुख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खराडीतील स्वीट इंडिया चौकाजवळील फॉर्च्युन प्लाझाच्या दुसऱ्या मजल्यावरील ‘वेल बॉडी स्पा’मध्ये मसाजच्या नावाखाली देहविक्री सुरू असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखा युनिट-7 ला मिळाली. त्यानंतर पोलीस निरीक्षक वहीद पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाईचे नियोजन करण्यात आले. कारवाईपूर्वी पोलिसांनी पंच आणि एका बनावट ग्राहकाची नियुक्ती केली. या ग्राहकाकडे क्रमांक नोंदवलेल्या 500 रुपयांच्या 12 नोटांसह सहा हजार रुपये देण्यात आले. त्याला स्पामध्ये जाऊन तेथे कोणत्या सेवा दिल्या जातात आणि त्यासाठी किती पैसे घेतले जातात, याची खातरजमा करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

त्यानुसार बनावट ग्राहक स्पामध्ये गेला. त्याने सुरुवातीला मसाजसाठी 1 हजार 500 रुपये दिले. त्यानंतर संबंधित महिलेने ‘अतिरिक्त सेवा’साठी आणखी 2 हजार 500 रुपये मागितल्याचे पोलिसांच्या पंचनाम्यात नमूद आहे. बनावट ग्राहकाने पोलिसांनी दिलेल्या नोटांमधून ही रक्कम दिल्यानंतर पोलिसांना फोन करून कारवाईसाठी संकेत दिला.
संकेत मिळताच, गुन्हे शाखेचे पथक स्पामध्ये दाखल झाले. एका खोलीत बनावट ग्राहकासोबत 25 वर्षीय महिला आढळून आली. पोलिसांनी तिची चौकशी केली असता ती गेल्या सुमारे 15 दिवसांपासून स्पामध्ये काम करीत असल्याचे सांगितली.

पोलिसांच्या माहितीनुसार, या महिलेला स्पा मॅनेजर राजू आणि मालक शाहरुख यांच्याकडून जादा पैशांचे आमिष दाखवून देहविक्री करण्यास प्रवृत्त केले जात असल्याचे तिने सांगितले. ग्राहकांकडून मिळणाऱ्या अतिरिक्त पैशांमधील काही रक्कम मॅनेजरला द्यावी लागत असल्याचेही तिने पोलिसांना सांगितल्याचे जबाबात नमूद आहे. पोलिसांनी महिलेची सुटका करून तिला महिला पोलिसांच्या ताब्यात सुरक्षिततेसाठी दिले आहे.
या छाप्यादरम्यान महिलेच्या अंगझडतीत बनावट ग्राहकाने दिलेल्या 2 हजार 500 रुपयांच्या पाच नोटा मिळून आल्या. तसेच स्पाच्या काउंटरच्या ड्रॉवरमध्ये बनावट ग्राहकाने मसाजसाठी दिलेल्या 1 हजार 500 रुपयांपैकी 1 हजार रुपयांच्या दोन नोटा आढळल्या. याशिवाय पोलिसांनी चार मोबाईल फोन आणि दोन डेल कंपनीचे लॅपटॉप जप्त केले आहेत. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत 81 हजार 500 रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
या प्रकरणी स्पा मॅनेजर राजू आणि मालक शाहरुख यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील कलम 143(1)(3), 3(5) तसेच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायदा 1956 मधील कलम 3,4 आणि 5 अन्वये कारवाई करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट-7 चे पोलीस निरीक्षक वहीद अ. पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.






