संदीप टूले
केडगाव(पुणे) : दौंड तालुक्यातील यवत येथील ग्रामीण रुग्णालयातील रक्त तपासणी विभाग वेळेआधीच बंद होत असल्यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. यामुळे नागरिकांमध्ये ग्रामीण रुग्णालयाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर यवत येथे असलेले ग्रामीण रुग्णालय हे यवत आणि पंचक्रोशीमधील असलेल्या ग्रामीण भागातील गरीब व गरजू रुग्णांसाठी उपयुक्त ठरत आहे.
या रुग्णालयाचा रूग्णांना मोठा आधार असून, या रुग्णालयाच्या कारभाराबाबतच्या सुविधा सध्या रामभरोसे असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या येण्याच्या व जाण्याच्या वेळा निश्चित नसल्याने नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यवत व पंचक्रोशीतील नागरिकांच्या सेवेसाठी असलेले यवत ग्रामीण रुग्णालय सकाळी वेळेत सुरू होत नसल्याची चर्चा सध्या परिसरातील नागरिक करत आहेत; परंतु बंद होण्याच्या वेळेपूर्वीच अनेक सेवा बंद केल्या जात असल्याची नागरिकांमध्ये जोरदार चर्चा चालू आहे.
बाह्यरुग्ण विभागात रुग्णांची रांग असताना देखील याठिकाणी रक्त तपासणीसाठी असणारी प्रयोगशाळा देखील वेळेच्या आधीच बंद करून कर्मचारी कुलूप लावून निघून जात असल्याची चर्चा आहे. रुग्णांना मात्र बाहेरून रक्त तपासणीसाठी खिशाला आर्थिक झळ सोसावी लागत आहे. रुग्णांनी तक्रार केल्याचा प्रयत्न केला, तरी उद्धटपणे बोलून त्यांची बोलती बंद केली जाते. अशा मुजोर कर्मचाऱ्यांकडे आरोग्य विभाग लक्ष देईल का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
रक्त तपासणी मशीन बंद…
ग्रामीण रुग्णालयात रक्त तपासणी मशीनद्वारे केली जाते हे मशीन मागील चार दिवसांपासून बंद असल्याची माहिती मिळत आहे. ही मशीन कधी दुरुस्त होईल, याची माहिती विचारली असता कोणालाही याची माहिती देता येत नाही. यामुळे मॅन्युअली रक्ताची तपासणी करण्यात येत असल्याची माहिती कर्मचारी वर्गातून दिली जात आहे.
स्वच्छतागृहात स्वच्छतेचा अभाव
रुग्णालयामध्ये महिला आणि पुरुष असे दोन विभाग असून, त्या विभागांमध्ये असणाऱ्या स्वच्छतागृहांमध्ये अस्वच्छता पसरली आहे. दोन, तीन दिवस स्वच्छतागृह साफ न केल्यामुळे रुग्ण विभागात दुर्गंधी पसरली आहे. येथील रुग्णांना या दुर्गंधीत उपचार घ्यावे लागत असल्याची तक्रार महिला आणि पुरुषांच्या रुग्ण विभागातून केली जात आहे.
स्वच्छतागृहात स्वच्छतेचा अभाव आहे. येथे महिला आणि पुरुष असे दोन विभाग आहेत, पण स्वच्छतागृहात अस्वच्छता पसरली आहे. रुग्णांनी स्वच्छतागृहात उलटी केली होती, त्यानंतर दोन दिवस स्वच्छ्ता केली नव्हती. स्वच्छतागृहात पाण्याचा सुद्धा तुटवडा असतो.
-कमल परदेशी, रुग्ण
जोपर्यंत बाह्यरुग्ण विभाग चालू आहे तोपर्यंत रक्त तपासणी करणारी प्रयोगशाळा देखील चालू ठेवावी लागते. जर बाह्यरुग्ण विभागात रुग्ण असतील आणि प्रयोगशाळा बंद करण्यात आली असल्यास आणिनागरिकांची गैरसोय झाली असल्यास, त्याची चौकशी करण्यात येईल.
-डॉ. बाळासाहेब कदम, वैद्यकीय अधीक्षक वर्ग-१, यवत