Yavat News यवत : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण मंडळ ( महावितरण) केडगाव विभागाच्या कार्यकारी अभियंता पदी संदीप दरवडे यांची नियुक्ती झाल्याबद्दल अखिल भारतीय ग्राहक पंचायत यांच्या वतीने नवनियुक्त कार्यकारी अभियंता संदीप दरवडे त्यांचा शाल, श्रीफळ व वीज ग्राहकांचे पुस्तके भेट देऊन सन्मान करण्यात आला. (Yavat News)
दौंड व शिरूर तालुक्यातील अनियमित लोडशेडिंग चालू असून याचा शेतकऱ्यांना व ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे, दिवसातून ३ तासच सुरळीत वीज पुरवठा होत असल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. रोहित्र खराब झाल्यास होणारी अडचण यांसह ग्राहकांच्या विविध समस्यांचे निवेदन देण्यात आले, शेतकऱ्यांना किमान ८ तास नियमित वीजपुरवठा व्हावा, जळालेले रोहित्र ४८ तासात उपलब्ध व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
शेतकरी व वीजग्राहकांच्या प्रश्नांवर चर्चा करून त्याची सोडवणूक होण्यासाठी प्रयत्न करण्याची आश्वासन यावेळी कार्यकारी अधिकारी संदीप दरवडे यांनी दिले यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे दौंड तालुका अध्यक्ष नामदेव होले, शिरूर तालुका अध्यक्ष संपत फराटे, ऊर्जा समिती प्रमुख राहुल दिघे, सुनील कदम, संदीप लवांडे, अमोल भागवत,अमित मापारी, कैलास कदम,सुरेश लोंढे आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.