दीपक खिलारे
इंदापूर (पुणे) : डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या, अतिशय रोमांचकारी आणि क्षणा-क्षणाला उत्कंठा वाढवणाऱ्या तुल्यबळ लढतीमध्ये पैलवान सिकंदर शेख आणि माऊली कोकाटे हे नीरा भीमा कारखान्याच्या शहाजी केसरी कुस्ती किताबाचे मानकरी ठरले आहेत. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते सिकंदर शेख आणि माऊली कोकाटे यांना मानाची गदा प्रदान करण्यात आली.
इंदापूर तालुक्यातील शहाजीनगर येथे रविवारी २५ फेब्रुवारीला लोकनेते कै. शहाजीराव पाटील यांच्या ४५ व्या पुण्यतिथीनिमित्त कारखान्याचे संस्थापक हर्षवर्धन पाटील यांचे मार्गदर्शनाखाली शहाजी केसरी कुस्ती आखाड्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शहाजी केसरी किताबासाठी प्रमुख दोन लढती झाल्या.
पहिल्या प्रमुख लढतीत पैलवान सिकंदर शेख ने हिंदकेसरी प्रिन्स कोहली याच्यावर दोन वेळा मोळी पट टाकून चित करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यातून कोहलीने सुटका केली. दरम्यान, कोहलीच्या गुडग्याला इजा झाल्याने तो डावाच्या बाहेर पडला. त्यानंतर सिकंदर शेखला सलग दुसऱ्या वर्षी शहाजी केसरी किताबासाठी विजयी घोषित करण्यात आले.
तर दुसऱ्या प्रमुख लढतीत माऊली कोकाटे याने महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटीलला चितपट केले. अन्य लढतीमध्ये उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड ने उपमहाराष्ट्र केसरी प्रकाश बनकर वर मात केली. तर सनी पंजाबीने रोमहर्षक लढतीत सुहास गोडगे वर विजय मिळविला. तसेच मनीष रायते याने विक्रम भोसले याचेवर तुल्यबळ लढतीत मात केली.
यावेळी मल्ल सम्राट रावसाहेब मगर, महाराष्ट्र केसरी शिवाजी पाचपुते, महाराष्ट्र केसरी बापू लोखंडे, महाराष्ट्र केसरी छोटा रावसाहेब मगर, पैलवान आप्पासो कदम,पैलवान मौला शेख,पैलवान अस्लम काझी, शिवछत्रपती पुरस्कार विजेते गोविंद पवार, कुस्ती कोच विश्वास हरगुले आदीसह राज्यभरातून आलेले मल्ल, इंदापूर तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार!
ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी, अर्जुन पुरस्कार विजेते नरसिंह यादव, अर्जुन पुरस्कार विजेते राहुल आवारे, अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार यांचा यावेळी हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते सत्कार कारण्यात आला. यावेळी हर्षवर्धन पाटील म्हणाले, कर्मयोगी शंकररावजी पाटील व लोकनेते शहाजीराव पाटील यांनी कुस्तीला नेहमीच प्रोत्साहन दिले. इंदापूर येथे सन २००५ मध्ये आयोजित केलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा उल्लेख हर्षवर्धन पाटील यांनी केला. पैलवान माऊली कोकाटेच्या रुपाने इंदापूर तालुक्याला महाराष्ट्र केसरी पद मिळावे,अशी अपेक्षा पाटील यांनी व्यक्त केली.