मुंबई : संसदेत सुरू असलेल्या राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. अमित शाह संसदेत येऊन जंतरमंतरवरील आंदोलनादरम्यान झालेल्या कारवाईबाबत स्पष्टीकरण देत नाहीत, तोपर्यंत संसदेचे कामकाज सुरळीत चालणार नाही, असा इशारा राऊत यांनी दिला.

राऊत यांनी आरोप केला की, जंतरमंतरवरील आंदोलनावेळी लाठीचार्ज, अश्रुधुराचा वापर आणि पॅलेट गन चालवण्याचे आदेश नेमके कोणी दिले, याचे उत्तर गृहमंत्र्यांनी संसदेत येऊन द्यावे. या मुद्द्यावर विरोधकांनी संसदेत आक्रमक भूमिका घेतली असून, 5 ऑगस्ट रोजी इंडिया आघाडीच्या खासदारांनीही आंदोलन केले.

अमित शाह संसदेत उपस्थित राहत नसल्यावरून राऊत यांनी त्यांच्यावर टीका करत सरकारवर निशाणा साधला. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही खोचक टिप्पणी केली. सरकारने महत्त्वाच्या प्रश्नांवर उत्तर देण्याची गरज असल्याचे राऊत म्हणाले. संजय राऊत यांनी टीका करताना म्हटले की, सध्याची भूमिका पाहता अमित शाह यांना ‘गुंगा गुड्डा’ म्हणावे लागेल का, असा सवाल उपस्थित होतो. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही निशाणा साधत त्यांनाही ‘गुंगा गुड्डा’ झालेत असे म्हणत सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

दरम्यान, सुनेत्रा पवार यांच्याबाबत झालेल्या “गुंगी गुडिया” या वक्तव्यावरही संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. एखाद्या पुरुष नेत्याबाबत अशी टिप्पणी झाली असती तर त्याला वेगळ्या शब्दांत संबोधले गेले असते, असे ते म्हणाले. राजकारणात टीका सहन करण्याची तयारी ठेवावी लागते, मात्र भविष्यात अशा चुका होऊ नयेत याची काळजी घेतली पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.
इंदिरा गांधी यांना पूर्वी “गुंगी गुडिया” अशी उपमा दिली गेली होती, मात्र त्यांनी आपल्या नेतृत्वातून आपली क्षमता सिद्ध केली, असेही राऊत यांनी सांगितले. सुनेत्रा पवार या केवळ व्यक्ती नसून राज्याच्या उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांच्या पदाचा आणि जबाबदारीचा विचार केला पाहिजे, असे त्यांनी नमूद केले. दरम्यान, संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात पुढे काय होणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.







