शिरूर: शिरूर शहरातील शिक्षक कॉलनी परिसरात एका महिलेच्या घरात जबरदस्तीने घुसून तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीविरोधात गंभीर कलमांखाली कारवाई सुरू करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (ता.13 )दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास आरोपी पांडा गरूड (रा.चव्हाणवाडी,करडे, ता.शिरूर,जि.पुणे) याने संबंधित महिलेच्या राहत्या घरात बळजबरीने प्रवेश केला. त्यानंतर त्याने महिलेवर जबरदस्ती करत तिच्या अंगावर हात टाकून विनयभंग केला.तसेच तिला शिवीगाळ व दमदाटी करत दहशत निर्माण केली.

महिलेने विरोध करून आरडाओरडा करण्याचा इशारा दिल्यानंतर आरोपीने अधिक आक्रमक होत तिचे अश्लील फोटो व व्हिडिओ आपल्या मोबाईल व पेनड्राइव्हमध्ये असल्याचे सांगून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली.तसेच जीवे मारण्याची धमकी देत आरोपी चारचाकी वाहनातून घटनास्थळावरून पसार झाला.
या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून,पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण करीत आहेत.







