आळेफाटा, (पुणे) : जुन्नर तालुक्यातील पिंपरी पेंढार येथे ५० वर्षीय महिलेचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही दुर्दैवी घटना आज शुक्रवारी (दि.१०) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास पिंपळवंडी- पिंपरी पेंढार रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या शेतात घडली. नानुबाई सीताराम कडाळे (वय-४५ रा. पिंपळदरी वानदरी, ता. अकोले) असं मृत्यू झालेल्या महिलेच नाव आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, राजेश प्रभाकर पडवळ यांच्या शेतात नानुबाई या कामगार म्हणून काम करत होत्या. शुक्रवारी सकाळी नानुबाई या शेतातील बाजरी पिकाचे राखण करत असताना बाजूच्या शेतामध्ये दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला करून उसाच्या शेतात ओढत नेले. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला. सदर घटनेची माहिती वनविभागाला मिळताच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
जुन्नर येथे बिबट्यांनी धुमाकूळ
जुन्नर येथे बिबट्यांनी धुमाकूळ घातला आहे. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी बिबटे पकडण्यासाठी वनविभागाला आदेश द्यायला पाहिजे, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. येथील बिबटे हे नरभक्षक झाले असून दररोज बिबट्याच्या हल्ल्यात नागरिकांचे मृत्यू होत आहेत. मग आम्ही घराबाहेर पडायचं कसं असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
बिबट्याच्या हल्ल्याचे प्रमाण वाढले
जुन्नर तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून बिबट्याच्या हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे. पाच तारखेला पिंपळवंडीच्या लेंडेस्थळ या ठिकाणी अश्विनी हुळवळे या महिलेवर बिबट्याने हल्ला केला होतं. तर दोन दिवसांपूर्वी काळवाडीच्या रुद्र फापाळे या ८ वर्षाच्या मुलावर बिबट्याने हल्ला करून ठार केल्याची घटना घडली आहे.