पुणे: बारामतीच्या श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली असून, या निवडणुकीच्या निमित्ताने बारामतीच्या राजकारणात पुन्हा एकदा नवी राजकीय समीकरणे पाहायला मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी स्वतंत्र शेतकरी पॅनेल उभे करून निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखालील पॅनेलसमोर युगेंद्र पवार यांच्या पॅनेलचे आव्हान असण्याची शक्यता आहे.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर आता सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीतही पवार कुटुंबातील राजकीय संघर्षाची छाया दिसण्याची शक्यता आहे. मात्र, ही निवडणूक पवार विरुद्ध पवार अशी करण्याचा आमचा हेतू नाही, असे युगेंद्र पवार यांनी स्पष्ट केले. शेतकरी सभासदांसमोर सक्षम पर्याय उभा करण्यासाठी आपण निवडणूक लढवत असल्याचे त्यांनी सांगितले.

सुनेत्रा पवार यांच्याबाबत आपला कोणताही आक्षेप नसून कारखान्याच्या विद्यमान संचालक मंडळाच्या कारभाराबाबत प्रश्न आहेत, असे युगेंद्र पवार यांनी म्हटले. अनेक वर्षांपासून एकाच कुटुंबाकडे सत्ता असल्याने यंदा बदल होणे गरजेचे आहे. हा बदल संविधानिक आणि लोकशाही मार्गाने घडवून आणू, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सोमेश्वर साखर कारखान्याकडे लक्ष द्यावे, अशी सभासदांची इच्छा असल्याचे युगेंद्र पवार म्हणाले. पवार विरुद्ध पवार असा प्रचार करण्याऐवजी ‘पवार विथ पवार’ असेही होऊ शकते, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले.
ऊसाला चांगला दर मिळावा, साखरेचा दर्जा सुधारावा, नियोजित वेळापत्रकानुसार ऊसतोड व्हावी, कामगारांची भरती गुणवत्तेच्या आधारावर व्हावी आणि कारखान्याचा कारभार पारदर्शक पद्धतीने चालावा, या मुद्द्यांवर सभासदांसमोर जाणार असल्याचे युगेंद्र पवार यांनी सांगितले.
दरम्यान, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दोन दिवसांपूर्वी शेतकरी मेळावा घेत सोमेश्वर साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन सभासदांना केले होते. अजित पवार यांच्या विचारांनीच सोमेश्वरची निवडणूक होईल, असे सुनेत्रा पवार यांनी यावेळी म्हटले होते. त्यामुळे आता युगेंद्र पवार यांनी स्वतंत्र पॅनेल उभे करण्याचे संकेत दिल्याने निवडणुकीतील राजकीय समीकरणांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक प्रशासनाने जाहीर केली असून ११ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. १२ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होईल. कारखान्याचे कार्यक्षेत्र सुमारे १५० गावांमध्ये असून बारामती, पुरंदर, खंडाळा आणि फलटण तालुक्यांतील शेतकरी सभासद या निवडणुकीत सहभागी होणार आहेत. त्यामुळे या निवडणुकीला शेतकरी वर्गासह बारामतीच्या राजकीय वर्तुळात विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
बारामती बातम्या, सुनेत्रा पवार, युगेंद्र पवार, बारामती राजकारण, श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना, श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना निवडणूक, श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना बारामती, राष्ट्रवादी,






