पिंपरी-चिंचवड : शहरातील दुर्गा टेकडीवरील 227 झाडे तोडण्याच्या प्रस्तावाला विरोध करण्यासाठी नागरिकांनी गुरुवारी (26 नोव्हेंबर) चिपको आंदोलन केले. सकाळी 8 ते 10 या वेळेत झालेल्या या आंदोलनात नागरिकांनी वृक्षतोडीच्या नोटिसा लावलेल्या झाडांना मिठी मारून आपला निषेध व्यक्त केला. झाडे वाचवण्यासाठी एकत्र आलेल्या आंदोलकांनी महापालिका प्रशासनाविरोधात घोषणाबाजीही केली.

दुर्गा टेकडीवर पाण्याची टाकी उभारण्याचे नियोजन असल्याने 227 झाडे तोडण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. मात्र, ही टाकी टेकडीवर न उभारता बंद पडलेल्या वॉटर पार्कच्या जागेत किंवा वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाच्या परिसरात उभारावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
दुर्गा टेकडीवर दररोज सकाळी अनेक नागरिक, महिला, ज्येष्ठ व्यक्ती आणि विद्यार्थी येथे फिरण्यासाठी तसेच योगासने आणि व्यायामासाठी येतात. वाढते शहरीकरण आणि प्रदूषण लक्षात घेता या परिसरातील झाडे टिकवणे आवश्यक असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. वृक्षांमुळे परिसरातील पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होते, असेही त्यांनी सांगितले.

नागरिकांच्या आक्षेपांचा गांभीर्याने विचार न झाल्यास राजकीय पक्ष, सामाजिक संस्था, महिला, युवक, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना सोबत घेऊन मोठे आंदोलन उभारले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. या आंदोलनात विविध सामाजिक कार्यकर्ते, स्थानिक नागरिक, विद्यार्थी आणि महिला सहभागी झाले होते.







