भिगवण : इंदापूर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. दोन दिवसांपूर्वी पत्नीचा मृत्यू झाल्याने नैराश्यात गेलेल्या पतीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही दुःखद घटना भिगवण येथील मदनवाडी येथे आज रविवारी दुपारच्या सुमारास घडली आहे.
गोपाळ उर्फ स्वप्नील प्रदीप सुतार (वय-२४) असं आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे. तर श्रावणी गोपाळ सुतार (वय.२०) यांचे डेंग्यूच्या आजाराने मृत्यू झाला आहे. या घटनेने भिगवण व मदनवाडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मदनवाडी येथील श्रावणी सुतार यांचे डेंग्यूच्या आजारामुळे शुक्रवारी (दि २७) निधन झाले होते. या दुःखद घटनेतून सावरत असतानाच श्रावणी यांचा पती गोपाळ सुतार हे रविवार (दि २९) दुपारी घरी बसले होते. त्यावेळी मला कंटाळा आलाय मी जरा आराम करतो, असे सांगून एका खोलीत गेले. त्या खोलीच्या छताला नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली.
याबाबत गोपाळ यांचा भाऊ संतोष सुतार यांनी भिगवण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली दिली आहे. या घटनेमुळे श्रावणी आणि गोपाळ यांची सात महिन्यांची उर्वा ही चिमुकली पोरकी झाली आहे. गोपाळची भिगवण येथे मोबाईल शॉपीचे दुकान होते. या घटनेमुळे भिगवण व मदनवाडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.