फुरसुंगी, ता. २२ : दारूच्या व्यसनाधीन पतीकडून वारंवार मारहाण, शिवीगाळ आणि मानसिक छळ सहन करावा लागत असल्याचा गंभीर आरोप करत एका विवाहित महिलेने पतीविरोधात कायदेशीर तक्रार दाखल केली आहे. विशेष म्हणजे, जन्मापासून गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या सहा वर्षीय मुलाच्या उपचारांचा खर्चही न उचलता पत्नीला माहेरून पैसे आणण्यासाठी तगादा लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी फुरसुंगी पोलीस ठाण्यात दारुड्या पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंगेश विनोद कदम (वय ३४) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी फुरसुंगी येथील हरपळेवस्ती परिसरात राहणाऱ्या एका 27 वर्षीय विवाहितेने फुरसुंगी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता या ससाणेनगर, काळेपडळ येथील डी-मार्टमध्ये नोकरी करतात. सन २०१९ मध्ये त्यांचा विवाह मंगेश कदम यांच्याशी झाला होता. लग्नानंतर काही काळ सर्व काही सुरळीत सुरू होते. मात्र, पतीला दारूचे व्यसन जडल्याने कौटुंबिक आयुष्यात तणाव वाढू लागला. दारूच्या नशेत पत्नीला शिवीगाळ करणे, मारहाण करणे आणि वारंवार अपमानास्पद वागणूक देणे, हा प्रकार सुरू झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

दांपत्याला एक ६ वर्षाचा मुलगा आहे. हा मुलगा जन्मापासूनच फिट्सच्या आजाराने त्रस्त असून त्याला बोलताही येत नाही. गेल्या पाच वर्षांपासून त्याच्यावर पुण्यातील के. एम. रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुलाच्या उपचारासाठी मोठा खर्च होत असतानाही पतीने कोणतीही आर्थिक जबाबदारी स्वीकारली नसल्याचे महिलेने म्हटले आहे. मुलाच्या उपचारासाठी आणि घरखर्चासाठी पैसे मागितल्यावर पतीने मदत करण्याऐवजी “तुझ्या बापाकडून पैसे घेऊन ये,” असे म्हणत शिवीगाळ व मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
यामुळे अखेर पीडिता यांनी चार वर्षांपूर्वी पतीपासून विभक्त राहण्याचा निर्णय घेतला. पीडिता यांनी पुणे पोलीस आयुक्तालयातील भरोसा सेलमध्येही तक्रार दाखल केली होती. समुपदेशनासाठी पतीला नोटीस देण्यात आली होती. मात्र, त्याने समुपदेशन प्रक्रियेला प्रतिसाद दिला नाही. उलट, भरोसा सेलमध्ये तक्रार का केली, याचा जाब विचारत फोनवरून धमक्या आणि शिवीगाळ केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
मंगेश कदम याने पत्नी आणि मुलाची देखभाल न करता त्यांना घराबाहेर काढल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आईच्या मदतीने आणि स्वतः नोकरी करून मुलाचा सांभाळ करत असल्याचे महिलेने पोलिसांना सांगितले. या प्रकरणी मंगेश विनोद कदम यांच्याविरोधात शारीरिक आणि मानसिक छळ, मारहाण तसेच आर्थिक त्रास दिल्याबाबत फुरसुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.







