पुणे: पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे एका अल्पवयीन मुलीचा बालविवाह वेळेत रोखण्यात पोलिसांना यश आले आहे. एका जागरूक नागरिकाने दिलेल्या माहितीनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत विवाह सोहळा थांबवला. या घटनेमुळे एका मुलीला बालविवाहाच्या विळख्यात अडकण्यापासून वाचवण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, जुन्नर तालुक्यातील 14 वर्षे 10 महिने वयाच्या मुलीचा विवाह वाघोली येथे राहणाऱ्या 26 वर्षीय तरुणाशी ठरवण्यात आला होता. आळंदीतील एका मंगल कार्यालयात विवाहाची तयारी पूर्ण झाली होती. पाहुणेही जमू लागले होते. मात्र, याचवेळी एका नागरिकाने संबंधित विवाहात वधू अल्पवयीन असल्याची माहिती हेल्पलाईनवर दिली.

माहिती मिळताच आळंदी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी विवाहस्थळी जाऊन वधू, वर आणि दोन्ही कुटुंबीयांना ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर संबंधितांना बालविवाहाबाबतचे कायदे आणि त्याचे परिणाम समजावून सांगण्यात आले.
चौकशीदरम्यान मुलीच्या आईने आपली आर्थिक आणि कौटुंबिक अडचण पोलिसांसमोर मांडली. पतीचे निधन झाल्यानंतर मुलीचा सांभाळ करणे कठीण झाल्याने तिच्या भविष्यासाठी हा निर्णय घेतल्याचे तिने सांगितले. मात्र, परिस्थिती कितीही कठीण असली तरी कायद्यानुसार अल्पवयीन मुलीचा विवाह करणे हा गुन्हा असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
पोलिसांनी समुपदेशन करून हा विवाह थांबवला. तसेच संबंधित प्रकरणात बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेमुळे बालविवाहासारख्या सामाजिक समस्येविरोधात जागरूकता आणि त्वरित कारवाई किती महत्त्वाची आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
एका नागरिकाच्या सतर्कतेमुळे आणि पोलिसांच्या तातडीच्या हस्तक्षेपामुळे एका अल्पवयीन मुलीचे भविष्य सुरक्षित करण्यात मदत झाली आहे.






