पुणे : NEET पेपरफुटीच्या मुद्द्यावरून देशभरात निर्माण झालेल्या प्रचंड असंतोषामुळे आणि ‘जेन-झी’ पिढीच्या वाढत्या आंदोलनामुळे केंद्र सरकारला मोठा निर्णय घ्यावा लागला आहे. या राजकीय घडामोडींनंतर धर्मेंद्र प्रधान यांनी शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा दिला असून, त्यांच्या जागी प्रल्हाद जोशी यांची नवे केंद्रीय शिक्षणमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

नवी जबाबदारी स्वीकारल्यानंतर प्रल्हाद जोशी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. “मी ही जबाबदारी अतिशय विनम्रतेने स्वीकारत आहे. हे माझ्यासाठी मोठं दायित्व आहे.पंतप्रधान मोदींनी माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्याचा आणि हे कर्तव्य निष्ठेने पार पाडण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

आपल्या वक्तव्यात जोशी यांनी मोदी सरकारच्या 12 वर्षांच्या काळातील कामगिरीचा गौरव केला. तसेच, माजी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या कार्याचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, “गेल्या 4 ते 4 वर्षांत धर्मेंद्र प्रधान यांनी नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाची (NEP) प्रभावी अंमलबजावणी केली आणि शिक्षण क्षेत्रात महत्त्वाचे बदल घडवून आणले. आता पंतप्रधान मोदींच्या मार्गदर्शनाखाली हे काम मी पुढे नेणार आहे.”
कोण आहेत प्रल्हाद जोशी?
दीर्घ राजकीय अनुभव: प्रल्हाद जोशी हे कर्नाटकातील भाजपचे वरिष्ठ नेते असून 2004 पासून ते धारवाड लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. 2004 च्या पहिल्याच निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या बी. एस. पाटील यांचा पराभव केला होता.
संघटन कौशल्य: 2014 ते 2016 या काळात त्यांनी कर्नाटक भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.
राजकीय प्रवास: राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून (RSS) त्यांनी आपल्या प्रवासाला सुरुवात केली. 1992 ते 1994 या काळात हुबळी येथील ईदगाह मैदानावर तिरंगा फडकवण्यासाठी झालेल्या आंदोलनामुळे ते देशभरात प्रसिद्धीझोतात आले. याशिवाय ‘काश्मीर बचाव’ आंदोलनातही त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता.
शिक्षण क्षेत्रातील या मोठ्या फेरबदलामुळे आता नवीन शिक्षणमंत्री या आव्हानात्मक परिस्थितीत काय पावले उचलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





