पुणे : यंदा राज्यात झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक भागांत पाणी साचले असून, डासांची पैदास मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. परिणामी, साथीच्या आजारांचा प्रसार वेगाने होत आहे. पुणे जिल्ह्यात डेंग्यूचे 3762 आणि मलेरियाचे 2036 रुग्ण आढळल्याची नोंद आरोग्य विभागाने केली आहे. या वाढत्या आकडेवारीमुळे आरोग्य यंत्रणा पूर्णपणे सतर्क झाली आहे.

नागरिकांनी वेळेवर वैद्यकीय सल्ला घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तुम्हाला किंवा कुटुंबातील कोणालाही ताप, तीव्र डोकेदुखी, अंगदुखी, अशक्तपणा, उलट्या होणे किंवा त्वचेवर लाल पुरळ उठणे अशी लक्षणे दिसल्यास अंगावर न काढता त्वरित जवळच्या दवाखान्यात जाऊन तपासणी करून घ्यावी, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.

डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य प्रशासनाने शहर तसेच ग्रामीण भागात विशेष मोहिमा सुरू केल्या आहेत. साचलेले पाणी हे डासांसाठी अंडी घालण्याचे मुख्य केंद्र बनते. त्यामुळे घराच्या परिसरात पाणी साचणार नाही याची दक्षता घेणे, भांडी व टाक्या वेळोवेळी स्वच्छ करून कोरड्या ठेवणे आणि स्वच्छता राखणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.
साथीच्या आजारांना वेळीच अटकाव करण्यासाठी केवळ सरकारी प्रयत्न पुरेसे नसून, प्रशासकीय उपाययोजना आणि नागरिकांचे सहकार्य एकत्र आले, तरच या परिस्थितीवर यशस्वीपणे नियंत्रण मिळवता येईल, असा विश्वास आरोग्य अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.







