पुणे: देशभरात स्पर्धा परीक्षा आणि भरती प्रक्रियेतील गैरप्रकारांचे मुद्दे सातत्याने चर्चेत आहेत. नीट (NEET) परीक्षेतील वादानंतर आता महाराष्ट्रातील औषध निरीक्षक (Drug Inspector) भरती परीक्षेबाबत गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या परीक्षेचा पेपर फुटल्याचा दावा काही विद्यार्थ्यांनी केला असून, त्यामुळे परीक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात औषध निरीक्षक पदासाठीची भरती परीक्षा 22 March 2026 रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी मोठ्या संख्येने उमेदवारांनी अर्ज केले होते. मात्र, परीक्षा होण्याच्या दोन दिवस आधी म्हणजेच 20 March रोजीच प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न सोशल मीडिया व्हायरल केल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.

विद्यार्थ्यांच्या दाव्यानुसार, परीक्षेतील तब्बल 90 प्रश्न व्हॉट्सॲप आणि टेलिग्रामसारख्या माध्यमांवर आधीच शेअर करण्यात आले होते. तसेच, पेपर मिळवून देण्यासाठी आणि त्याची उत्तरे देण्यासाठी मोठ्या रकमेची मागणी करण्यात आल्याचे काही चॅट्स आणि स्क्रीनशॉट्समधून समोर आल्याचे सांगितले जात आहे. काही ठिकाणी 5 लाख रुपयांपर्यंत पैशांची मागणी झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
या प्रकरणामुळे भरती प्रक्रियेतील पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. मेहनत करून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये यामुळे नाराजीचे वातावरण आहे. गरीब आणि सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी अनेक महिने तयारी करून परीक्षेला सामोरे जातात. मात्र, अशा प्रकारच्या गैरप्रकारांमुळे त्यांच्या मेहनतीवर पाणी फिरत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, औषध निरीक्षक भरती परीक्षेतील पेपरफुटीच्या आरोपांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे. या प्रकरणात प्रशासनाकडून पुढील काय कारवाई केली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






