पुणे : विधानसभा 2024 ची सार्वत्रिक निवडणूकीचा महत्त्वाचा टप्पा आज पार पडला असून दौंड विधानसभा मतदारसंघात मतदान अपवाद वगळता सर्वत्र शांततेत पार पडले आहे. मागील निवडणुकीपेक्षा यंदा मतदानाच्या टक्केवारीत वाढ परिस्थिती आहे. अजूनही काही ठिकाणची मतदान टक्केवारी येण्याचे बाकी आहे. मागील वर्षापेक्षा मतदानाच्या टक्केवारीत वाढ होत असून वाढलेल्या मतांचा टक्का नेमका कोणाच्या पथ्यावर पडतो? याची धास्ती महायुती व महाआघाडीच्या कार्यकर्त्यांना लागली आहे. २००९ मध्ये ६९.१३% , २०१४ मध्ये ७३.३२ % तर २०१९ मध्ये ६८ % मतदान झाले होते, तर यावेळी सायंकाळी 7 पर्यंतच ७२.२६ % मतदान झाले आहे.
यंदाच्या दौंड विधानसभा मतदारसंघात मुख्य लढत ही महायुतीचे अधिकृत उमेदवार राहुल कुल व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार रमेश थोरात यांच्यामध्ये होत असली तरी बहुजन समाज पार्टी, राष्ट्रीय मराठा पार्टी, संभाजी ब्रिगेड व अपक्ष असे एकूण १४ उमेदवार रिंगणात आहेत. राहुल कुल हे भाजपाचे विद्यमान आमदार असून महायुतीच्या जागा वाटपामध्ये ही जागा भाजपाला आली आहे. राहुल कुल यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेतली होती. राहुल कुल यांना युतीचे सरकार आल्यास मंत्रीपद देणार असल्याचे आश्वासन यावेळी त्यांनी तालुक्यातील जनतेला दिले आहे. तर रमेश थोरात यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार अमोल कोल्हे, खासदार निलेश लंके आदींनी सभा घेत दौंडची जागा महाविकास आघाडीला मिळाल्यासाठी प्रयत्न केले आहेत.
2009 च्या निवडणुकीत रमेश थोरात यांनी राहुल कुल यांचा पराभव केला होता. तर २०१४ निवडणुकीत ११३४५ तर २०१९ च्या निवडणुकीत राहुल कुल यांनी रमेश थोरात यांचा अवघ्या ७४६ मतांच्या फरकाने पराभव केला होता. यंदा महायुतीला व महाविकास आघाडीला अपेक्षित असलेले मतदान न झाल्याने त्यामागील कारणांचा महायुती व महाविकास आघाडीकडून शोध घेतला जात आहे. आतापर्यंत झालेल्या मतदानावरून अंदाज बांधले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे वीरधवल जगदाळे, वंचित आघाडीचे बादशाह शेख, मराठा समाजाचे राजाभाऊ तांबे, वसंत साळुंखे यांनी निवडणुकीपूर्वी माघार घेतली असल्याने दौंड तालुक्यातील खरी लढत ही राहुल कुल व रमेश थोरात यांच्यात होत आहे. निवडणुकीतील अन्य उमेदवार किती मते घेतात आणि “नोटा’चा पर्याय किती मतदार स्वीकारतात? यावर देखील समीकरणे अवलंबून असणार आहे.
लोकसभेची मते काळजी वाढवणारी..
2019 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात भाजपाच्या उमेदवार कांचन कुल यांना दौंड मतदारसंघातून अवघ्या 7053 मतांची आघाडी मिळाली होती. परंतु, नुकत्याच मध्ये पार पडलेल्या लोकसभा २०१४ च्या निवडणुकीत शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवार यांच्यात निवडणूक पार पडली होती. यावेळी अजित पवार महायुतीत असून देखील दौंड तालुक्यातुन खासदार सुप्रिया सुळे यांना दौंड मतदारसंघातून जवळपास २६ हजार पेक्षा जास्त मतांची आघाडी मिळाली होती. यंदा अजित पवार गटाचे काही प्रमुख पदाधिकारी वगळता गाव पातळीवर असलेल्या इतर पदाधिकारी यांनी रमेश थोरात यांना पाठिंबा दिल्याचे चित्र तालुक्यात निर्माण झाले होते. यामुळे ही वाढलेली मते कोणाच्या पारड्यात जातात? हे पाहण्यासाठी 23 तारखेची वाट पहावी लागणार आहे.
दरम्यान आमदार राहुल कुल यांनी सकाळी ७.३० च्या सुमारास राहू येथील मतदान केंद्रावर पत्नी कांचन कुल, मातोश्री माजी आमदार श्रीमती रंजना कुल यांच्या समवेत तर खुटबाव येथील मतदान केंद्रावर महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश थोरात यांनी पत्नी मंगल थोरात, पुत्र युवा नेते तुषार थोरात व कुटुंबियांसह मतदानाचा हक्क बजावला असून कुल व थोरात या दोघांनीही आपणच विजयी होणार असल्याचे सांगितले