सागर जगदाळे
भिगवण : भिगवण पोलीस ठाणे सद्या कोणत्या न कोणत्या कारणाने चर्चेत आहे. भिगवणमध्ये सद्या कायदा व सुव्यवस्थेचा खेळखंडोबा उडालेला दिसतोय. त्यातच भर म्हणून शहरामध्ये बेशिस्त झालेली पार्किंग. या बेशिस्त पार्किंगला भिगवण पोलीस शिस्त लावण्यासाठी कोणत्याही प्रकारची ठोस उपाययोजना करताना दिसत नाही.
भिगवण मुख्य बाजार पेठेत तर मोठमोठाली वाहने दुतर्फामध्येच उभी केली जातात. त्यामुळे एखादे मोठे वाहन आले तर वाहतूक कोंडी ही नित्याची ठरली आहे. चौकाचौकात पोलीस किंवा होमगार्ड उभे दिसतात, पण जो तो मोबाईलमध्ये अथवा गप्पा मारण्यात व्यस्त असतानाचे चित्र पाहायला मिळत आहे. बेशिस्त पार्किंगला शिस्त लावण्याची तजबीज किंवा पळापळ कोणी करताना पाहायला मिळत नाही. त्यामुळे चौकाचौकात पोलीस उभे असतात. मात्र कर्तव्य पार पाडण्याची जबाबदारी विसरून जातात.
काही वर्षांपूर्वी मुख्य बाजार पेठेसह इतर बाजारपेठेत सम विषय तारखेच्या पार्किंगचा फॉर्म्युला वापरून शिस्त लावण्याचा प्रयत्न केला होता. तो फॉर्म्युला बऱ्यापैकी यशस्वी झाला होता. भिगवण पोलीस ठाण्यामध्ये वाहतूक व पार्किंग समस्यांवर भिगवण पोलीस ठाण्यातून बदलून घेलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी खूप मोठे काम केले होते.
पार्किंग क्षेत्रावर त्यांनी खूप लक्ष दिल्यामुळे सकाळ व संध्याकाळी महामार्ग लगत सेवा रस्त्यावरती होणारे पार्किंग समस्येवरती त्यांनी चांगले कार्य केले होते. सद्यस्थितीला होणाऱ्या बेशिस्त पार्किंगच्या समस्येमुळे नागरिकांना भिगवण पोलीस ठाण्यातुन बदलून गेलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही.
बाजारपेठेत खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्राहकांनाही या बेशिस्त पार्किंगमुळे खूप मोठे समस्यांना तोड द्यावे लागत असल्यामुळे या समस्येवर लवकरात लवकर काहीतरी उपाययोजना करावी अशी मागणी होत आहे. आडव्या लावलेल्या मोठ्या वाहनांमुळे रस्ता काढताना मोठ्या वाहन चालकांमध्ये खटके उडत आहे. उपाययोजना केल्या तर त्या तात्पुरत्या स्वरूपाच्या नसून दीर्घकालीन व सातत्यपूर्ण असाव्यात अशीही मागणी होत आहे.