तुषार सणस
भोर : ता. 22 शिंदेवाडी ते खेड शिवापूर टोलनाका दरम्यान असलेल्या पुणे सातारा रस्त्यावरील दुभाजक विनापरवानगी तोडलेले आहेत, त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झालेली असताना देखील याकडे एन एच ए आय, रिलायन्स इन्फ्रा, यांच्यासह राजगड पोलिसांचे सोयीस्कर दुर्लक्ष असल्याच्या चर्चेला भागात उधाण आले आहे. याठिकाणी एखादी दुर्घटना घडल्यास महामार्ग प्रशासनावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नागरिक करीत आहे. त्यामुळे विनापरवानगी तोडलेले दुभाजक कधी पूर्ववत होणार याकडे अवघ्या भागाचे लक्ष लागले आहे.
पुणे सातारा मुख्य रस्त्यावरील दुभाजक काही व्यावसायिकांनी हेतूपूर्वक तोडलेले आहेत. यामुळे सेवा रस्त्यावरून जाणारे वाहन सेवा रस्त्याला येताना व मुख्य रस्त्यावरून सेवा रस्त्याला येताना मोठा अपघात होऊ शकतो. हे नाकारता येत नाही. मात्र या विनापरवाना तोडलेल्या दुभाजकाकडे संबधित प्रशासनाचे लक्ष का जात नाही अथवा जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
या दरम्यान अनेक छोटे अपघात झाले असून तोडलेले दुभाजक बंद करण्यात यावे. अशी मागणी केली होती मात्र या मागणीकडे कोणीही लक्ष देत नसल्याचे दिसून येत आहे. विनापरवाना तोडलेले दुभाजक पुन्हा लवकरात लवकर बंद करावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
तेरी भी चूप, और मेरी भी चूप तोडलेल्या दुभाजकाचा प्रश्न अनेक दिवस गाजत आहे. यावर एन एच ए आय, रिलायन्स इन्फ्रा, व पोलीस प्रशासन एकमेकांकडे बोट दाखवत आहेत. त्यामुळे तेरी भी चूप, और मेरी भी चूप असा खेळ या तिघांमध्ये सुरू आहे की काय अशी चर्चा शिवगंगा खोऱ्यातील नागरिकांकडून ऐकायला मिळत आहे.
ज्या ठिकाणी विनापरवानगी दुभाजक तोडले आहेत त्यावर कारवाई करण्यासाठी पोलीस संरक्षण मिळणे आवश्यक आहे. आम्ही संयुक्त कारवाई साठी पत्रक दिले असून केवळ पोलीस बंदोबस्त मिळत नसल्याने कारवाई करता येत नसल्याचे खेड शिवापूर टोलनाक्यावरील रिलायन्स इंफ्राचे व्यवस्थापक अमित भाटिया यांनी सांगितले.
आम्हाला पत्र दिले असले तरी कारवाईसाठी चर्चा करणे गरजेचे आहे. रिलायन्स इंफ्राच्या अधिकारी वर्गाने आमच्याशी चर्चा केली तर निश्चितच आम्ही संरक्षण दिले जाईल असे राजगड पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांनी सांगितले.