पुणे: पुणे-सातारा रस्त्यावरील श्री शंकर महाराज उड्डाणपुलाजवळ असलेल्या भुयारी मार्गात एका अनोळखी व्यक्तीचा अत्यंत क्रूरपणे खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा थरारक प्रकार घडला असून, यामुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. रविवारी सकाळी ही बाब निदर्शनास येताच नागरिकांनी पोलिसांना याची माहिती दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेला एक मृतदेह आढळला. मारेकऱ्याने अत्यंत निर्घृणपणे त्या व्यक्तीच्या डोक्यावर सिमेंटचा जड गट्टू आणि फरशीचे तुकडे घालून त्याचा जीव घेतला होता. घटनास्थळावरील हे भीषण दृश्य पाहून पोलिसांनाही धक्का बसला. प्राथमिक तपासानुसार, गंभीर जखमी झाल्यामुळे त्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त गजानन पवार आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार यांनी आपल्या पथकासह तातडीने धाव घेतली आणि परिसराची पाहणी केली.

या प्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस शिपाई आकाश कीर्तीकर यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे. सध्या मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, मयत व्यक्तीची ओळख पटवणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान असून अधिक तपास सुरु आहे.







