अक्षय टेमगिरे

शिक्रापूर : पोलीस म्हणजे संकटात धावून जाणारे माणुसकीचे खरे रक्षकही असतात याची प्रचिती शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार मिलिंद देवरे यांनी पुन्हा एकदा दिली आहे. तब्बल ११ महिन्यांच्या कालावधीत दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये त्यांनी दाखविलेल्या तत्परता, संवेदनशीलता आणि कर्तव्यदक्षतेमुळे दोन निष्पाप चिमुरड्या सुखरूपपणे त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात परतल्या त्यामुळे शिक्रापूर परिसरात त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

पहिली घटना २३ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी १ वाजता गस्तीदरम्यान चाकण चौक परिसरात सुमारे पाच वर्षीय तब्बसून झहीर खान ही चिमुरडी रडत असल्याचे कानिफनाथ रासकर यांच्या निदर्शनास आले होते. त्यांनी तात्काळ ही माहिती पोलीस हवालदार मिलिंद देवरे यांना दिली. देवरे यांनी क्षणाचाही विलंब न करता मुलीला सुरक्षित ताब्यात घेतले.
मुलगी हिंदी भाषेत बोलत असल्याने प्रथम तिचा विश्वास संपादन करण्यासाठी तिला शांत केले कॅडबरी दिली आणि तिच्याशी संवाद साधला. त्यानंतर तिचा फोटो सोशल मीडियावर प्रसारित करून पालकांचा शोध सुरू करण्यात आला. अल्पावधीतच माहिती मिळाली की, मुलीचे वडील झहीर अतिहुसेन खान हे भंगार दुकानात मजुरी करतात.
दुकानमालकाच्या मदतीने त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला आणि मुलगी सुखरूप असल्याची माहिती देण्यात आली. काही वेळातच वडील घटनास्थळी पोहोचले आणि आपल्या मुलीला सुरक्षित पाहताच त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू दाटले. माझ्या मुलीचे प्राण वाचवले, अशा शब्दांत त्यांनी मिलिंद देवरे आणि कानिफनाथ रासकर यांचे मनापासून आभार मानले होते.
दुसरी घटना नुकतीच चाकण चौक परिसरात दि. ११ जुलै रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास घडली स्थानिक नागरिक विनोद जाधव, राजू दान आणि राधेश्याम आहेर यांच्या निदर्शनास एक व्यक्ती अत्यंत मद्यधुंद अवस्थेत तीन वर्षीय बालिकेला घेऊन रस्त्यालगत पडलेला दिसून आला होता. तीन वर्षीय बालिकाही त्याच्यासोबत होती.
भयभीत अवस्थेतील त्या चिमुरडीची माहिती त्यांनी तात्काळ पोलीस हवालदार मिलिंद देवरे यांना दिली. माहिती मिळताच देवरे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी प्रथम बालिकेला सुरक्षितपणे जवळ घेत धीर दिला. त्यानंतर संबंधित व्यक्तीच्या खिशातील कागदपत्रांमधून मोबाईल क्रमांक मिळवून कुटुंबीयांशी संपर्क साधला. चौकशीत संबंधित कुटुंब शिरूर तालुक्यातील उरळगाव येथे कामानिमित्त राहत असल्याचे समोर आले. मुलीचे वडील तिला गावाकडे घेऊन जात असल्याचे सांगून निघाले होते मात्र दारूच्या अतिव्यसनामुळे ते रस्त्यावरच बेशुद्ध अवस्थेत पडले.
वेळेवर पोलिसांनी हस्तक्षेप केला नसता तर त्या निष्पाप बालिकेवर मोठे संकट ओढवण्याची शक्यता होती. काही वेळातच नातेवाईक घटनास्थळी पोहोचले. खात्री करून बालिकेला त्यांच्याकडे सुरक्षित ताब्यात देण्यात आले. आपल्या मुलीला सुखरूप पाहून कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले. मिलिंद देवरे हे आमच्यासाठी केवळ पोलीस नाहीत, तर साक्षात पांडुरंग आहेत,अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त करत त्यांचे आभार मानले. या दोन्ही घटनांमधून खाकी वर्दीमागील माणुसकीचा चेहरा पुन्हा एकदा समाजासमोर आला आहे.
वेळेवर हस्तक्षेप झाला नसता तर चिमुरड्यांवरती शारीरिक इजा, अपहरण किंवा अन्य गंभीर गुन्ह्यांचा धोका निर्माण होऊ शकला असता. त्यामुळे पोलीस हवालदार मिलिंद देवरे यांची सतर्कता आणि संवेदनशीलता एका कुटुंबापुरती मर्यादित न राहता संपूर्ण समाजासाठी आश्वासक ठरली आहे.
या घटनांमधून पालकांसाठीही महत्त्वाचा संदेश समोर आला आहे. लहान मुलांना कधीही एकटे सोडू नये, अनोळखी व्यक्तींकडून मदत घेऊ नये याबाबत त्यांना लहानपणापासूनच मार्गदर्शन करावे आणि सार्वजनिक ठिकाणी त्यांच्यावर सतत लक्ष ठेवावे, असे आवाहन पो.हा.मिलिंद देवरे यांच्याकडून करण्यात आले आहे.
तब्बल ११ महिन्यांत दोन चिमुरड्यांना सुखरूप कुटुंबीयांच्या स्वाधीन करून शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार मिलिंद देवरे यांनी केवळ आपले कर्तव्यच बजावले नाही, तर पोलीस म्हणजे समाजाचा खरा आधार ही भावना पुन्हा एकदा जिवंत केली आहे. त्यांच्या या माणुसकीपूर्ण कार्याला नागरिकांकडून सलाम केला जात असून, शिक्रापूर पोलीस दलाच्या कार्याबद्दल अभिमान व्यक्त केला जात आहे.







