वाघोली, ता. 22 : जागेच्या मालकीवरून सुरू असलेल्या वादाचे रूपांतर थेट मारहाण आणि दगडफेकीत झाल्याची घटना घडली आहे. ही घटना मांजरी खुर्द (ता. हवेली) येथे 20 सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. घराची जागा आपल्या मालकीच्या जमिनीत येत असल्याचा दावा करत काही जण जेसीबी घेऊन घर पाडण्यासाठी आले असल्याचा प्रकार समोर आला आहे. यावेळी झालेल्या वादात तिघेजण जखमी झाले आहेट.

या प्रकरणी मयुर विठ्ठल पवार (वय 30, रा. पवार वस्ती, मांजरी खुर्द) यांनी वाघोली पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार संदेश पवार, कुणाल पवार, शिवाजी पवार, सोमनाथ पवार, दीपक पवार, राहुल पवार आणि चार ते पाच अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मांजरी खुर्द येथील गट क्रमांक 628 मध्ये पवार कुटुंबाचे वडिलोपार्जित घर आहे. याच गट क्रमांकात संदेश सिताराम पवार, कुणाल पवार आणि शिवाजी किसन पवार यांचीही जमीन असल्याचे तक्रारीत नमूद आहे.

काही महिन्यांपूर्वी संबंधितांनी त्यांच्या जागेची खासगी मोजणी केली होती. त्यावेळी पवार कुटुंबाचे घर त्यांच्या जमिनीत येत असल्याचा दावा करण्यात आला. यावर मयुर पवार यांनी सरकारी मोजणीसाठी अर्ज केल्याचे सांगून, मोजणीत ज्याच्या वाट्याला जी जागा येईल ती देण्याची तयारी दर्शविल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

संदेश पवार याने मयुर पवार यांना फोन करून सरकारी मोजणी कधी होणार, अशी विचारणा 20 सप्टेंबर रोजी सायंकाळी केली. त्यावेळी मोजणी लवकर होणार असल्याचे सांगितल्यानंतर, ‘मोजणी कधीही होऊ दे, आज तुझे घर पाडून जागा ताब्यात घेणार’, असे धमकावल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
यानंतर रात्री नऊच्या सुमारास संदेश पवार, कुणाल पवार, शिवाजी पवार, सोमनाथ पवार, दीपक पवार, राहुल पवार यांच्यासह चार ते पाच अनोळखी व्यक्ती स्विफ्ट कार आणि दुचाकीवरून जेसीबी घेऊन पवार यांच्या घरी आले. घर पाडण्यावरून वाद झाल्यानंतर संदेश पवार याने मयुर पवार यांना मारहाण केली. त्यानंतर इतरांनी शिवीगाळ करत दगडफेक केल्याने मयुर यांच्या हाताला व बरगडीला दुखापत झाली. त्यांचे वडील विठ्ठल पवार आणि पत्नी नम्रता पवार यांनाही मारहाण करण्यातआली. त्यांना वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या प्रतिक आव्हाळे आणि विशाल आव्हाळे यांनाही मारहाण झाली आहे.
वादाच्या वेळी संशयितांनी पवार यांच्या स्विफ्ट कार, क्रेटा आणि टँकरवर दगडफेक केल्याचा आरोप आहे. या दगडफेकीत वाहनांच्या काचा फुटल्या असून दरवाजांचेही नुकसान झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, ‘गाडीमधील कोयता काढ, याला जीवे ठार मारतो’, अशी धमकी संदेश पवार याने साथीदारांना दिल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. त्यानंतर संबंधित सर्वजण घटनास्थळावरून निघून गेल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी संदेश पवार, कुणाल पवार, शिवाजी पवार, सोमनाथ पवार, दीपक पवार, राहुल पवार आणि चार ते पाच अनोळखी व्यक्तींविरोधात कायदेशीर तक्रार करण्यात आली असून, वाघोली पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.







