पुणे : लोहगाव येथील निंबाळकर रस्त्यावर समोरून आलेल्या भरधाव दुचाकीने दिलेल्या धडकेत 30 वर्षीय IT इंजिनीअर सौरभ अनंत शेलार यांचा मृत्यू झाला. हा अपघात रविवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडला.

सौरभ हे लोहगावमधील धानोरी जकात नाका परिसरात राहत होते. ते येरवडा येथील एका IT कंपनीत नोकरी करत होते. रविवारी ते बुलेटवरून निंबाळकर रस्त्याने जात असताना समोरून आलेल्या भरधाव दुचाकीने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली.

धडकेनंतर सौरभ रस्त्यावर कोसळले. त्यांच्या छातीला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर संबंधित दुचाकीचालक घटनास्थळावरून फरार झाल्याचे सांगितले जात आहे. स्थानिक नागरिकांनी सौरभ यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असतानाच सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला.

सौरभ यांच्या पश्चात आई-वडील, मोठा भाऊ आणि बहीण असा परिवार आहे. विशेष म्हणजे, येत्या नोव्हेंबरमध्ये त्यांचा विवाह होणार होता. त्यामुळे शेलार कुटुंबात लग्नाची तयारी सुरू होती. मात्र विवाहाच्या काही आठवडे आधीच झालेल्या या अपघातामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या अपघातानंतर फरार झालेल्या दुचाकीचालकाचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.






