फुरसुंगी, ता. 14 : शेजारील बांधकामाच्या किरकोळ वादाने अचानक हिंसक वळण घेतल्याची धक्कादायक घटना फुरसुंगी (ता. हवेली) परिसरात शनिवारी (ता.11 ) सकाळी साडेनऊ वाजण्याच्या घडली आहे.“‘आम्ही दोन फुट सोडलं, तूही सोड’… असे म्हणताच फुरसुंगीत वॉचमनवर लोखंडी सळईने जीवघेणा हल्ला केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. तर पोलीस ठाण्यात दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शुभम नेटके (वय 24) व त्याचा साथीदार शंभु हंबीर असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी दिनेश शंकरराव वाळंजकर (वय 50,आशीर्वाद नगर, फुरसुंगी) यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वाळंजकर हे कुटुंबासह फुरसुंगीतील आशीर्वाद नगर येथे राहतात व वॉचमन म्हणून काम करतात. त्यांच्या शेजारी राहणारा शुभम नेटके याच्या घराचे बांधकाम सुरू असून, त्यातूनच हा वाद उफाळून आला.
वाळंजकर यांनी शुभम नेटके याला बांधकाम करताना दोन फुट जागा सोडण्यास सांगितले. तसेच घरासमोर पडलेले सिमेंट हटवण्याबाबतही सांगितले. या कारणावरून संतापलेल्या शुभमने शिवीगाळ करत वाळंजकर यांच्यावर अचानक हल्ला चढवला. वाद वाढताच शुभमने जवळच पडलेली लोखंडी सळई उचलून वाळंजकर यांच्या हनुवटीवर जोरदार वार केला. तसेच छाती व पायावरही मारहाण करून त्यांना जखमी केले. वाद सोडवण्यासाठी आलेल्या त्यांच्या पत्नी वैशाली व मुलगा पियुष यांनाही शिवीगाळ करण्यात आली.
या घटनेनंतर जखमी अवस्थेत तक्रार देण्यासाठी जात असताना आरोपी शुभम नेटके हा त्याचा मित्र शंभु हंबीर याला घेऊन पुन्हा समोर आला. दोघांनी मिळून वाळंजकर कुटुंबीयांना शिवीगाळ करत मारहाणीची धमकी दिली. यानंतर जखमी वाळंजकर यांना उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर त्यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार आरोपी शुभम नेटके व त्याचा साथीदार शंभु हंबीर यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 अंतर्गत कलम 115(2), 118(1), 3(5), 351(2), 352 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.







