संदीप टूले
केडगाव : सध्या उन्हाळा सुरू झाला असून, लोकांचा कल हा साहजिकच फळांचा राजा म्हणून ओळख असणाऱ्या आंबा, मोसंबी, संत्रा, केळी, कलिंगड, लिंबू पपई, टरबूज, फळांची मागणी वाढ आहे. उन्हाळा असल्यामुळे या फळांचा वापर हा प्रत्येक घरात होतोच त्यात पाहुण्यांच्या पाहुणचारासाठी तर आमरस हा केलाच जातो. मात्र, हेच आंबे बाजारात केमिकल (कार्बाइड) वापरून फक्त काही तासांतच कच्चे केळ, आंबा, पपई, टरबूज ही फळे पिकवून बाजारात आणले जात असल्याचा प्रकार समोर येत आहे.
फळ विक्रेते शरीराला घातक असे प्रेस्टिसाइड (कार्बाइड) नावाचे रसायन सर्रास वापरत असून, या केमिकलमुळे कर्करोग होण्याची धोका सर्वाधिक असल्याचे समोर आले आहे. हे पिवळे आणि सुंदर दिसणारी केळी, आंबे, पपई लोकांचे लक्ष आपल्याकडे आकर्षित करते. परंतु, हीच फळे आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. फळ लवकर पिकावे म्हणून फळ विक्रेत्याकडून केमिकलचा वापर होत आहे.
स्वतःची आमदनी वाढवण्यासाठी फळ विक्रेत्यांकडून जनतेच्या आरोग्याशी खेळ खेळला जात आहे. परंतु, आत्तापर्यंत कधीच फळ विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आल्याचे पाहण्यात आले नाही. त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी फळे घेताना काळजी घेणे गरजेचे असून, विश्वासू विक्रेत्यांकडूनच फळे घ्यावीत.
अशी केली जाते ग्राहकांची फसवणूक
केळी घेताना केळी पिवळी दिसते. पण केमिकलमध्ये पिकवल्याने त्याचे देठ हे हिरवेच असते. दोन दिवसात संपूर्ण केळी काळी पडते. तसेच आता आंब्याचा हंगाम चालू झाला आहे. यात ग्राहकाला सांगितलं जात की, आंबा हा एसीमध्ये पिकवला जातो, पण ग्राहक कधीच त्या गोडाऊनपर्यंत जाऊन पाहत नाहीत. आंबा देखील केमिकलमध्येच पिकवतात. वरवर जरी आंबा पिकलेला वाटत असला तरी आतमध्ये पांढरा व आंबट असतो. तरी जनतेने फळ विकत घेताना शहानिशा करूनच फळे विकत घ्यावीत.
भाजी मंडईतच पिकवले जाताहेत फळे
कार्बाइडमुळे एका दिवसातच केळी, आंबे पिकवली जातात. यामुळे नुकसान आहे, परंतु आमच्याकडे दुसरा पर्यायही नाही. कारण, ही फळे पिकविण्याची झटपट पद्धत आहे. भाजी मंडईतच ही फळे पिकविले जातात व हीच फळे लगेच विक्रीसाठी उपलब्ध होतात. अशा पद्धतीने पिकवलेली फळे ही चमकबाज दिसतात. त्यामुळे ग्राहकही हीच फळे लगेच खरेदी करतात.
– फळ विक्रेता
कार्बाइड हे केमिकल आरोग्यासाठी खूपच घातक
कार्बाइड हे केमिकल खूप घातक आहे. व्यापाऱ्यांकडे दुसरा पर्याय नसल्याचे म्हणतात, पण हे सरळसरळ गंभीर आजारांना निमंत्रणच ठरत आहे. मार्केटमध्ये येणारी पपई, केळी, टरबूज व अशी अनेक फळे कार्बाइड पिकवली जात असतील, तर फळांना कार्बाइडने पिकवल्याने त्यातील व्हिटॅमिन व पोषकतत्त्व खूप कमी होतात. हे एकप्रकारे आजारांना निमंत्रणच आहे.
– डॉ. निखिल थोरात, थोरात हॉस्पिटल, केडगाव