लोणी काळभोर : परतीचा मान्सूनचा कळ सुरु असतानाच आता कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत ठिकठिकाणी पाणीटंचाई जाणवायला सुरुवात झाली आहे. त्यातच पाणी दोन दिवसातून एकदा आणि ते पण फक्त अर्धा तास पाणी येत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
कदमवाकवस्ती परिसरातील लोणी स्टेशन, घोरपडेवस्ती व इंदिरानगर परिसरात पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. लोणी स्टेशन परिसरात सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास केवळ अर्धा तास पाणी सोडण्यात येते. ते पण कमी दाबाने आणि अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांचे हाल सुरू आहेत. तर या भागातील सोसायट्यांना खासगी टॅंकर घेतल्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. यामुळे नागरिकांना खूप मोठा आर्थिक फटका बसत आहे.
दरम्यान, कदमवाकवस्ती गावाचा मोठ्या प्रमाणात विकास झाला असून गावाची लोकसंख्या ६० हजारहून अधिक आहे. मात्र, गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी पाऊस कमी पडला आहे. ग्रामपंचायतीला पाणी पुरवठा करणाऱ्यासाठी विहिरी आहेत. या विहिरीतून पाणी उपसून गावाला पिण्यासाठी पुरविले जाते. मात्र मुळा मुठा कालव्याला पाणी नसल्यास या सर्व पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींचे पाणी लक्षणीयरित्या कमी होते. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.
पाणीटंचाईचा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा
घरामध्ये पाणी पिण्याच्या व्यतिरिक्त वापरासाठीही लागते. पाणी दोन दिवसातून एकदा आणि ते पण फक्त अर्धा तास पाणी येत असे, तर घरातील खूप कामे राहतात. एकीकडे विकासाच्या गप्पा मारत असताना दुसरीकडे मात्र पिण्याच्या पाण्याची किती गंभीर समस्या आहे. त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधींनी याकडे तात्काळ लक्ष द्यावे व पाणीटंचाईचा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा.
पल्लवी गायकवाड (लोणी स्टेशन, ता. हवेली)