भिगवण : यंदा कमी पाऊस झाल्यामुळे अनेक भागांत पाण्याची टंचाई जाणावणार आहे. त्यामुळे भिगवण ग्रामपंचायतीने पुढील काळात होणारी पाणीटंचाई लक्षात घेता आतापासूनच तयारी सुरू केली आहे. १५ व्या वित्त आयोगाच्या पाणीपुरवठा निधीतून गावातील प्रत्येक वॉर्ड मध्ये बोअरवेल घेण्यास सुरुवात केली आहे. त्यातील वॉर्ड क्र.२ (साई मंदिर) आणि वॉर्ड क्र. ४ (स्वामी विवेकानंद नगर), तसेच भिगवण स्टेशन येथील वॉर्ड क्र.५ व ६ येथे बोअर घेण्यात आले आहेत. चारही वॉर्ड मध्ये मुबलक प्रमाणात पाणी लागले असून नागरिकांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे.
दरम्यान, उशिराने दाखल झालेला मॉन्सून नागरिकांमध्ये चिंता निर्माण करुन गेला. राज्यात आणि देशात मॉन्सून उशिराने आला. त्यानंतर पावसाचा मोठा खंड पडला. ऑगस्ट महिना वगळता राज्यात चांगला पाऊस झाला नाही. यामुळे सर्व अपेक्षा परतीच्या पावसावर होती. परंतु परतीचा पाऊसही चांगला झाला नाही. यामुळे येणाऱ्या काळात चिंता निर्माण करणारी परिस्थिती असणार आहे. पावसाच्या या तुटीचा परिणाम शेती आणि पिण्याच्या पाण्यावर होणार आहे.
राज्यातील अनेक प्रकल्प,धरणे पूर्णपणे भरलेले नाहीत.यामुळे येणाऱ्या उन्हाळ्यात पाण्याचे नियोजन करणे अवघड होणार आहे.उजनीच्या नदीपात्रातही पुरेसे पाणी उपलब्ध नाही त्यामुळे गावात पिण्याच्या पाण्याची अडचण होऊ नये म्हणून आतापासूनच नियोजन सुरू केले आहे.
-दिपीका क्षीरसागर, सरपंच भिगवण