पुणे: पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातून एक संतापजनक बातमी समोर आली आहे. घरगुती गॅस सिलिंडरमध्ये पाणी निघाल्याचा धक्कादायक दावा एका ग्राहकाने केला आहे. सध्या गॅस सिलिंडरचा तुटवडा जाणवत असल्याने नागरिक आधीच त्रस्त आहेत, त्यातच घडलेल्या या प्रकारामुळे ग्राहकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

ग्राहकाने भिगवण येथील ‘अंजली इंडेन गॅस’ या केंद्रावरून नवीन सिलिंडर विकत घेतला होता. घरच्या वापरासाठी घेतलेला हा सिलिंडर जोडल्यानंतर अवघ्या 2 ते 3 दिवसांतच संपला. शंका आल्याने टाकी हलवून पाहिली असता, आतमध्ये द्रव पदार्थ असल्याचे जाणवले आणि टाकीतून आवाजही येत होता. धक्कादायक म्हणजे, जेव्हा त्याने चावीच्या साहाय्याने वाल्व्ह दाबून पाहिला, तेव्हा सिलिंडरमधून चक्क पाणी बाहेर आले.

या प्रकारानंतर ग्राहकाने संबंधित गॅस वितरण केंद्राच्या व्यवस्थापनाकडे नोंदवली. एजन्सीने त्यांना ‘तुम्ही सिलिंडर घेऊन या, टाकीत जेवढे पाणी असेल, तेवढा गॅस आम्ही भरून देऊ’ असे मोघम आश्वासन दिले. दरम्यान, गॅस सिलिंडरच्या गुणवत्तेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.








