अमित मुंडीक

पुणे: वारजे माळवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुलेट दुचाकींना मॉडिफाय केलेले व फटाके वाजविणारे सायलेंसर बसवून ध्वनीप्रदूषण करणाऱ्या चालकांविरोधात पोलिसांनी परिणामकारक कारवाई केली. नागरिकांकडून वारंवार तक्रारी प्राप्त झाल्यानंतर 10 फेब्रुवारी 2026 रोजी ही विशेष मोहीम राबविण्यात आली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक नेमण्यात आले. वारजे, कर्वेनगर व शिवणे परिसरात पेट्रोलिंग करून मॉडिफाय सायलेंसर लावून शांततेचा भंग करणाऱ्या 15 बुलेट दुचाकी चालकांविरुद्ध वाहतूक विभागाच्या मदतीने कारवाई करण्यात आली. संबंधित दुचाकींचे सायलेंसर जप्त करण्यात आले.

चौकशीदरम्यान संबंधित चालकांनी हे सायलेंसर वारजे येथील ‘रॉयल बाईक सर्विस’ या गॅरेजमध्ये बसविल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी गॅरेजवर छापा टाकला असता मालक योगेश दामोदर सपकाळ (वय 33) हे मॉडिफाय व फटाके वाजविणारे सायलेंसर बसविताना आढळून आले.
त्यांच्याविरुद्ध वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. 43/2026 दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता कलम 223, 270, 49, मोटार वाहन कायदा कलम 190(2) व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37(1)(3) सह 135 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
दरम्यान, जप्त केलेले मॉडिफाय सायलेंसर आरएमडी कॉलेजसमोर रोड रोलरखाली चकणाचूर करण्यात आले. तसेच संबंधित दुचाकी चालकांचे समुपदेशन करण्यात आले.ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेशकुमार व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.







