नवी दिल्ली: ‘वंदे मातरम्’ या गीताच्या (National Song) (Vande Mataram New Protocol) रचनेला आता 150 वर्षे पूर्ण होत आहेत. या दीड शतकाच्या प्रवासाचे औचित्य साधून केंद्र सरकारने एक मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. गृह मंत्रालयाने ‘वंदे मातरम्’च्या गायन आणि वादनासाठी एक नवीन नियमावली (प्रोटोकॉल) जारी केली असून, त्याचे स्वरूप आता अधिक व्यापक करण्यात आले आहे.

बंकिमचंद्र चटोपाध्याय यांनी त्यांच्या ‘आनंद मठ’ या कादंबरीत 1876 मध्ये या गीताची रचना केली होती. दरम्यान, नवीन पिढीला संपूर्ण गीताची ओळख करून देण्यासाठी सरकारने हा बदल केला आहे.
नियमावलीतील बदल:
१. सहा कडव्यांचे पूर्ण गायन: आतापर्यंत केवळ सुरुवातीची काही कडवी गायली जात होती. मात्र, आता सरकारी कार्यक्रमांमध्ये संपूर्ण सहा कडव्यांसह वंदे मातरम् गाणे अनिवार्य असेल.

२. प्राधान्य क्रम: नवीन प्रोटोकॉलनुसार, ज्या कार्यक्रमात दोन्ही गीते गायली जाणार असतील, तिथे ‘जन गण मन’च्या आधी ‘वंदे मातरम्’ गायले जाईल.
३. शाळांसाठी नियम: देशातील सर्व शाळांमध्ये दिवसाच्या कामाची सुरुवात या राष्ट्रगीताच्या सामूहिक गायनाने करणे आता बंधनकारक असेल.
४. उभे राहणे बंधनकारक: वंदे मातरम् सुरू असताना प्रत्येकाने सन्मानाने उभे राहणे आवश्यक आहे.
५. व्हीव्हीआयपी प्रोटोकॉल: राष्ट्रपती किंवा राज्यपालांचे आगमन, नागरी सन्मान सोहळे आणि पदवीदान समारंभात तसेच आकाशवाणी किंवा दूरदर्शनवरून राष्ट्रपतींचे भाषण सुरू होण्यापूर्वी आणि संपल्यानंतर या गीताचे वादन अनिवार्य असेल.
अनेक दशकांपासून ‘वंदे मातरम्’च्या केवळ संक्षिप्त स्वरुपात गायले जात होते. मूळ रचनेतील सर्व कडव्यांच्या गायनामुळे त्यातील ऐतिहासिक संदर्भ आणि भौगोलिक वर्णनाचा वारसा लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल. विशेषतः सरकारी सोहळ्यांमध्ये शिस्त आणि एकवाक्यता आणण्यासाठी हा वेळ आणि क्रम निश्चित करण्यात आला आहे.






