Pune News: पुणे : पुणे शहरातील वाघोली आणि खराडी परिसरात पोलिसांच्या गणवेशात काही लोक पैसे मागत फिरत असल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात आला आहे. विनीथ के नावाच्या एका एक्स वापरकर्त्याने याबाबत पोस्ट करत नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. सकाळच्या कार्यालयीन वेळेत हे लोक पोलिस कल्याणाच्या नावाखाली पैसे मागतात, मात्र त्यांच्याकडे कोणतेही अधिकृत ओळखपत्र नसते, असे त्यांनी नमूद केले आहे. गेल्या काही वर्षांपासून हा प्रकार सुरू असल्याचेही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

या पोस्टनंतर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. पोलिसांचा वेश परिधान करून ते खोटा वॉरंट किंवा खोटा गुन्हा सांगत लोकांचे मनोरंजन करत असत, असं काहींनी प्रतिक्रिया दिली.
मात्र काळानुसार या परंपरेचे स्वरूप बदलले असल्याचे काहींनी म्हटले आहे. आता काही जण धर्मादाय संस्था किंवा कल्याणाच्या नावाखाली थेट पैसे मागत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे देणगी देण्यापूर्वी योग्य पडताळणी करावी, असा सल्ला सोशल मीडियावर दिला जात आहे.

काही नागरिकांनी अमनोरा आणि मगरपट्टा परिसरातही अशाच प्रकारचे लोक दिसल्याचे सांगितले आहे. नागरिकांनी अशा वेळी सतर्क राहावे आणि शंका असल्यास संबंधित अधिकाऱ्यांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे. पोलिस प्रशासनाकडून याबाबत अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.






