दीपक खिलारे
इंदापूर : वालचंदनगर इंडस्ट्रीजमधील कामगारांचा 17 ते 18 महिन्यांपासून संपलेला वेतनवाढीचा करार येत्या दोन महिन्यात करणे, तसेच सर्व थकीत पगार अदा करणे हे निर्णय मुंबईत कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या समवेत झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा गेली 42 दिवस चालू असलेला संप मिटला आहे. कर्मचारी 4 जानेवारीपासून कामावर रुजू होतील, अशी माहिती माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
हर्षवर्धन पाटील यांनी इंडस्ट्रीज कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी केलेली मध्यस्थी यशस्वी झाली आहे. इंडस्ट्रीजमधील कामगार 22 नोव्हेंबर पासून विविध मागण्यासाठी बेमुदत संपावर होते. राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे कामगारांच्या विविध प्रश्नांबाबत मुंबईत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत वालचंदनगर इंडस्ट्रीजचे मालक चिराग दोषी, वरिष्ठ अधिकारी, कामगार संघटनेचे पदाधिकारी आदींनी चर्चेमध्ये भाग घेतला. या बैठकीमध्ये सर्वमान्य तोडगा करण्यात आला आहे, अशी माहिती हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
वेतन वाढीचा करार कामगार मंत्र्यांच्या सहीने होणार असून करार संपला त्यापासूनचा फरक लागू होईल. तसेच कर्मचाऱ्यांच्या थकीत पगाराची 40 टक्के रक्कम येत्या सात दिवसात आणि त्यानंतर दोन महिन्यात 30 टक्के या प्रमाणे थकीत पगाराची सर्व रक्कम अदा करण्यात येणार आहे. तसेच कर्मचाऱ्यावर आकसाने शिस्तभंगाची कारवाई केली जाणार नसून, उत्पादन वाढीसाठी कर्मचाऱ्यांनी पाठपुरावा करावा, असे बैठकीत ठरल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.