लोणी काळभोर, (पुणे) : लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील मतदान उद्या सोमवारी (ता. १३) होणार आहे. या पार्श्वभूमीवर लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 19 केंद्रावर मतदान पार पडणार आहे. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी सर्वांनी कायदा व सुव्यवस्थेचे पालन करावे, असे आवाहन लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी केले आहे. तसेच आचारसंहितेचा कोणी भंग केला, तर त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
लोकसभा सार्वत्रिक निकाडणुका २०२४ च्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी लोणी काळभोर पोलिसांनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी (ता.११) पथ संचलन काढले होते. यावेळी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण, पोलीस निरीक्षक (गुन्हे) दत्ताराम बागवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाशांत खोसे, किशोर पवार, पोलीस उपनिरीक्षक हनुमंत तरटे, विष्णू देशमुख, किरण धायगुडे, गोपनीय विभागाचे हवालदार रामदास मेमाणे, रवी आहेर व पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी बोलताना शशिकांत चव्हाण म्हणाले की, सर्वसामान्य माणसाच्या जीवनात शांतता निर्माण करण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत, तसेच जर कोणी समाजकंटक शांतता भंग करण्याचा प्रयत्न करीत असेल, तर त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच पोलीस मदतीसाठी ११२ या नंबर क्रमांकवर कॉल करावा, असे आवाहन पथ संचलनादरम्यान त्यांनी केले.
दरम्यान, लोणी काळभोर गावातून शनिवारी (ता.११) संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पथ संचलनाला सुरुवात झाली. गावातील मंदिरे, मस्जिद येथून पथ संचलन काढण्यात आले. या पथ संचलनाचे आयोजन लोणी काळभोर पोलीस व केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाच्या जवानांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. पोलिसांच्या ताफ्याने शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले होते.
लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील केंद्रे :
लोणी काळभोर-६ केंद्रे २० बूथ, कदमवाकवस्ती-५ केंद्रे, १९ बूथ, थेऊर- २ केंद्रे ८ बूथ, कुंजीरवाडी-२ केंद्रे, ५ बूथ, तरडे-१ केंद्र, २ बुथ, आळंदी म्हातोबाची-३ केंद्रे व ४ बूथ असे एकूण २० केंद्रावर आणि ५८ बुथवर निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे.