फुरसुंगी : फुरसुंगीतील भेकराईनगर परिसरात जुन्या जमिनीच्या वादातून दोन शेजारी कुटुंबांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. या वादात महिलांसह कुटुंबीयांना मारहाण करण्यात आली असून लोखंडी रॉड व काठीचा वापर करून हल्ला करण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर घरासमोर उभ्या असलेल्या वाहनांचीही तोडफोड करण्यात आल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

अमृता काळे, अशोक काळे आणि आकाश काळे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी सारिका संतोष काळाने (रा. भेकराईनगर, फुरसुंगी) यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित दोन कुटुंबांमध्ये रस्त्याच्या जागेवरून न्यायालयात वाद सुरू आहे. २८ जून रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास अमृता काळे हिने घराबाहेर शिवीगाळ सुरू केल्याने दोन्ही बाजूंमध्ये वाद पेटला.

वाद सोडविण्यासाठी गेलेल्या सविता दिघे, सारिका काळाने व त्यांच्या सासूबाई यांनाही मारहाण करण्यात आल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. त्यानंतर अमृता काळे हिने हातातील लोखंडी रॉड घेऊन घराच्या गेटमध्ये प्रवेश केला. तिच्यासोबत आलेल्या आकाश काळे याने घरासमोरील वाहनांची तोडफोड केल्याचा तसेच अशोक काळे याने संतोष काळाने यांना काठीने मारहाण करून जखमी केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
जखमींवर उपचारासाठी ससून रुग्णालयात उपचार करण्यात आले. न्यायालयीन कामकाजामुळे तातडीने तक्रार देता आली नसल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले असून त्यानंतर फुरसुंगी पोलीस ठाण्यात संबंधित तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास फुरसुंगी पोलीस करीत आहेत.






