विशाल शिंदे

नसरापूर: नसरापूर बालिका अत्याचार प्रकरणाच्या तपासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे पोलीस अधिकारी, कर्मचारी, तपासात सहकार्य करणारे नागरिक तसेच घटनेचे योग्य वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नसरापूर तनिष्का व्यासपीठ, व्यापारी असोसिएशन आणि ग्रामस्थांच्या वतीने कृतज्ञता व रक्षाबंधन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी तपास अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार यांच्यासह तपासात सहकार्य करणाऱ्या पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी बोलताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार म्हणाल्या, “घटनेतील बालिका एका कुटुंबाची नव्हती, तर संपूर्ण नसरापूरकरांची लेक होती. ग्रामस्थांनी या केसचा केलेला पाठपुरावा व न्यायासाठी धरलेला आग्रह यामुळे आम्हालादेखील कामास बळ मिळाले. ग्रामस्थांची साक्ष तसेच येथील सीसीटीव्हीचे चित्रीकरण या तपासात अत्यंत महत्त्वपूर्ण ठरले. त्यामुळे विक्रमी वेळेत हा तपास पूर्ण करून आरोपीच्या फाशीसाठी सबळ पुरावे न्यायालयात दाखल करता आले.”

या प्रकरणाचा तपास अत्यंत आव्हानात्मक होता. घटना घडल्यापासून शिक्षा जाहीर होईपर्यंतच्या तपासाचा प्रवास पवार यांनी उपस्थितांसमोर उलगडला. त्या म्हणाल्या की, या गुन्ह्याबाबत सर्वांना अनेक गोष्टी माहिती होत्या; मात्र त्या माहितीचे अधिकृत कागदपत्रांमध्ये रूपांतर करून न्यायालयासमोर ठोस पुराव्यांच्या स्वरूपात सादर करणे हे मोठे आव्हान होते. या संपूर्ण प्रक्रियेत ग्रामीण जिल्ह्याचे तत्कालीन पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल तसेच इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन मिळाले.
तपासादरम्यान स्थानिक नागरिकांनी दिलेले सहकार्य, ग्रामस्थांच्या साक्षी आणि सीसीटीव्ही चित्रीकरण यामुळे तपासाला महत्त्वपूर्ण दिशा मिळाल्याचे पवार यांनी नमूद केले. न्याय मिळावा यासाठी नसरापूरकरांनी सातत्याने घेतलेली भूमिका आणि दाखविलेला आग्रह तपास पथकासाठी प्रेरणादायी ठरल्याचेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम राठोड, सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मचले, पोलीस हवालदार मंगेश कुंभार, औदुंबर अडवाल, योगेश जंगम, मोहसिन शेख, अतुल निर्मळ, रुपेश हारपुडे, राजू कुंभार, रुपेश ओव्हाळ, इम्रान मुलाणी यांचा सन्मान करण्यात आला. तसेच तपासात सहकार्य करणारे माणिक पवार, ग्रामस्थ गणेश दळवी आणि नीता शेटे यांचाही गौरव करण्यात आला.
यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मचले, हवालदार औदुंबर अडवाल, माणिक पवार, गणेश दळवी आणि नीता शेटे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तनिष्का प्रतिनिधी वैशाली झोरे यांनी केले. सूत्रसंचालन अर्चना दळवी यांनी केले, तर ज्योती चव्हाण यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या नियोजनासाठी स्मिता विभुते, मंगल खुटवड, रुपाली चक्के, शिला चाळेकर, उमा राशिनकर, जयश्री ठोंबरे, चांदभाभी शेख आणि वर्षा वाल्हेकर यांनी परिश्रम घेतले.







