युनूस तांबोळी / शिरूर : भांडवलाची गुंतवणूक व बाजारभावाची निराशा त्यातून होणारे कर्ज हे शेतकरी कुटूंबातील ग्रामीण चित्र आहे. पण समस्यांना सामोरे जात बापानं मुलीच्या शिक्षणासाठी पाठबळ द्याव. काळ्याभोर मातीच्या ढेकळातून चालणाऱ्या इवल्याशा पावलांसाठी पेरणीच्या चाड्यातून शिक्षणाच बिज रूजवांव. ती यश मिळवत प्रेमळ अंतकरणाने मिळालेल्या कामात धन्यता मानत सेवा भाव ही वृत्ती जोपासली.
आंबेगाव तालुक्यातील पारगाव शिंगवे येथील विद्या किसन लोखंडे ही अधिपरिचारीका रूग्णांची सेवा करत आहे. महिला असो की पुरूष, बालक असो की जेष्ठ वयोवृद्ध रूग्ण आपल्या प्रेमळ वाणीने मानसिक आधार देत त्यांची मने जिंकत उपचार करत सेवा करणारी आजची खरी नवदुर्गा ठरली आहे.
पारगाव शिंगवे (ता. आंबेगाव ) येथील किसन लोखंडे यांच्या शेतकरी कुटूंबात तिचा जन्म झाला. आई, तीन बहीण व एक भाऊ असा त्याचा परिवार आहे. विद्या ही सगळ्यात मोठी आहे व आई वडीलांची लाडकी असली तरी शेती कामात ती मदत करत असे. मात्र, आई वडीलांनी शिक्षणासाठी तिला पाठबळ दिलं. प्राथमिक व 12 पी पर्यंतचे शिक्षण घेऊन तिने बी. ए. पर्यंतचे शिक्षण पुर्ण केले आहे. शेतकरी कुटूंबात अनेक समस्या असतात. यावर मात करत सर्व मुलांना शिक्षण देऊन शहाणे करायचे असाचा आई वडीलांचा मानस होता. या काळात तिने वैद्यकिय क्षेत्रातला अधिपरिचारीका हा कोर्स पुर्ण केला.
शिक्षण घेतले तरी नोकरी लागेल याची शाश्वती नसल्याने मुलांना शिक्षणाबाबत गोडी राहिली नाही. मात्र, विद्याने हार मानली नाही. कॅान्ट्रक बेसेसवर जिल्हा परिषदेच्या आरोग्य केंद्रात तीने काम मिळवले. सध्या कवठे येमाई ( ता. शिरूर) येथील आरोग्य केंद्रात अधिपरिचारीका म्हणून ती कार्यरत आहे. रूग्णाना सेवा देण्यात तिचा चांगलाच हातखंडा आहे. त्यामुळे बहुतेक रूग्ण आल्यावर तिची आपुलकीने चौकशी करताना दिसतात. ट्रिपल डोस, माता बालक मार्गदर्शन, पोलिओ डोस यासारख्या अनेक सेवांच्या माध्यमातून ती रूग्णांच्या घरापर्यंत पोहचली आहे. गरोदर माता संगोपन याकडे तिने लक्ष दिल्याने बहुतेक नवविवाहित महिला या आरोग्य केंद्रात येताना पहावयास मिळतात.
सन 2015 ला विद्याचा विवाह मलठण ( ता. शिरूर ) येथील महेश गायकवाड यांच्याशी झाला. ते देखील रयतच्या आण्णासाहेब औटी कॅालेज मंचर येथे लॅब असिस्टंट म्हणून कार्यरत आहेत. मनमिळाऊ स्वभाव यामुळे ‘माहेर सारखच सासर’ मिळाल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर झळकताना दिसतो. दोन वर्षे कोरोना काळ हा सगळ्यात भयानक, आनंदी तसाच दुखःचा गेल्याची ती सांगते. या काळात रूग्णांना सहानभुतीची जास्त गरज होती. बाधित रूग्णांना कोविड केंद्रात दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्याची जबाबदारी तिने पाळली. या ठिकाणी दररोज व्यायाम घेऊन आलेल्या रूग्णांना मानसिक आधार व उपचार देण्याचे काम तिने केले. तीच्या सोबत काम करणारे सहकारी देखील तिच्या या प्रेमळ स्वभावाने अडचणीच्या काळात काम करू लागले होते.
रूग्णाचे परिवर्तन व्हावे…
सरकारी दवाखान्यात मोफत रूग्णांची सेवा असल्याने याकडे रूग्णांची ओढ कमी असते. यासाठी रूग्णांचे मनपरिवर्तन होणे गरजेचे आहे. मोफत तपासणी व औषधे यामुळे सरकारी दावाखान्यात उपचार घेण्याकडे कल वाढला पाहिजे. अधिपरिचारीका चा कोर्स करताना सातारा जिल्ह्यातील विद्या जाधव या मैत्रीणीने आर्थीक पाठबळ दिल्याने मी अधिपरिचारीका होऊ शकले. मैत्रीणीने दिलेला मानसिक आधार मोलाचा ठरला असे म्हणत तिला गहिवरून आले होते.