भोर : रायगड जिल्हा हद्दीतील भोर-महाड-भोर-पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गावरील वरंधा घाट ते महाड दरम्यानच्या प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने रस्त्याच्या कामामुळे वरंधा घाट 8 एप्रिल ते ३० मे पर्यंत सर्व प्रकारच्या वाहतूकीस बंद राहणार आहे. रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सोमवारी (ता.८) याबाबतचे आदेश जारी केला आहे. भोर-महाड मार्गावरील वरंधा घाट ते महाड या महाडच्या हद्दीतील २१ किलोमीटरच्या अंतरापैकी ८ किलोमीटर रस्त्याच्या दुपरीकरणाचे काम सुरु आहे.
या टापूत खोल दरी, उंच डोंगर आणि अरुंद रस्ता असल्यामुळे आणि रस्त्याचे व संरक्षण भिंतीचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावयाचे असल्यामुळे वरंध गाव ते वरंधा घाटातील रायगड जिल्ह्याच्या हद्दीपर्यतचा रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे. राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि पोलिस विभागाकडून अहवाल मागविल्यानंतर रायगडच्या जिल्हाधिका-यांनी हे आदेश जरी केले आहेत.
रस्ता बंद करण्यात आल्यामुळे महाडहून पुण्याला जाणा-या वाहनचालकांनी राजेवाडी फाटा-माणगाव-निजामपूर रोड-ताम्हीणी घाट-मुळशी-पिरंगुट पुणे आणि महाड-पोलादपूर-अंबेनळी घाट-वाई मार्गे पुणे या मार्गाचा वापर करावा. तसेच कोल्हापूरकडे जाण्यासाठी राजेवाडी फाटा-पोलादपूर-खेड-चिपळूण-पाटण-कराड-कोल्हापूर या मार्गाचा अवलंब करावा असे रायगडच्या जिल्हाधिका-यांनी कळविले आहे.