भोर : उत्रौली (ता.भोर) येथील गावात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे निवडणूक चिन्ह आणि खासदार सुप्रिया सुळे यांचा फोटो असलेला फ्लेक्स फाडण्यात आला. यामुळे राजकीय वातावरण ढवळले असून, या प्रकाराची माहिती पसरताच फाडलेला फ्लेक्स काढण्यात आला.
उत्रौली गावात महाविकास आघाडीच्या उमेदवार खासदार सुप्रिया सुळे यांचा व तुतारी चिन्हासह असलेल्या फ्लेक्सवर ब्लेड मारून फाडण्यात आला. महत्त्वाचे म्हणजे जिथे आज सुनेत्रा पवार यांचा कार्यक्रम आहे त्याच ठिकाणचा फ्लेक्स फाडला गेला. उद्धव ठाकरे आणि सुप्रिया सुळे यांच्या चेहऱ्याचा भागावर फुली मारून फ्लेक्स फडण्यात आला. या प्रकाराची माहिती मिळताच तात्काळ फाडलेला फ्लेक्स काढण्यात आला.
बारामती लोकसभा मतदारसंघात सध्या खासदार सुप्रिया सुळे विरुध्द सुनेत्रा पवार या नणंद-भावजय अशी लढत होईल, अशी चिन्हे आहेत. यामुळे सध्या वातावरण चांगलेच तापले असून, उत्रोली गावात खासदार सुळे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने लावलेला फ्लेक्स ब्लेडचा वापर करुन फाडला.
शरद पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक
या प्रकारामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. निवडणूक आचारसंहिता जाहीर होण्याआगोदरच राजकीय वातावरण चांगलेच तापायला लागले आहे. भविष्यात अजून वाद वाढण्याची शक्यता आहे.