उरुळी कांचन, (पुणे): उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे वाढले असून गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी उरुळी कांचन पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वांगडे (Police Inspector Sachin Wangde) यांना ‘सिंघम स्टाईल’ पद्धतीने काम करावे लगणार आहे. वारंवार होणाऱ्या हाणामाऱ्या, घरफोडी, दरोडे, वाहतूक कोंडी यांवर अंकुश ठेवण्यासाठी धडाकेबाज कामगारी करून दाखवावे लागणार असल्याची चर्चा उरुळी कांचनसह परिसरातील कट्ट्यावर रंगू लागली आहे.

उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे प्रथम वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी वेगवेगळे प्रयत्न करून वाहतूक कोंडी व गुन्हे काही प्रमाणात नियंत्रणात ठेवले होते. मात्र, नुकताच पदभार स्वीकारलेले पोलीस निरीक्षक सचीन वांगडे यांनी पदभार स्वीकारताच पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात गुन्ह्यांची मालिका थांबत नाही. त्यांनी पदभार स्वीकारताच दुसऱ्याच दिवशी एका तरुणीचा खून झाला होता. या कालवधीत खून, खुनाचा प्रयत्न, घरफोडी, वाहतूक कोंडी, सोनसाखळी व मंगळसुत्र चोरीचे अनेक गुन्हे घडत आहेत.
पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे जोरात सुरू असून, कारवाई होण्याआधीच अवैध धंदेवाल्यांना समजत आहे. त्यामुळे ठरावीक लोकांवरच कारवाई केल्याचे दाखविले जात असल्याची चर्चा पोलिसांत व सर्वसामान्य नागरिकांमध्ये जोरदार सुरु आहे. मात्र कारवाई झाल्यानंतर काही दिवसांनी पुन्हा अवैध धंदे सुरू होतात.
अपघात, चोरी, दरोडा असे अनेक गुन्हे घडल्यानंतरही आरोपी पकडला जात नाही. गुन्ह्यांकडे वरिष्ठ अधिकारी गांभीर्याने पाहत नसल्याची ओरड होत आहे. मात्र, पोलिसांना याचे काही देणे-घेणे नसून काय करायचे ते करा, वरिष्ठांकडे तक्रार करा आम्हाला फरक पडत नाही, असे पोलिसांकडून बोलले जात आहे. तर मागील काही दिवसांपासून उरुळी कांचन पोलीस ठाण्यातील काही पुरुष व महिला कर्मचारी अधिकाऱ्याकडे तक्रार जाऊ नये म्हणून ‘तडजोडी’चा मार्ग निवडत आहेत.
पोलीस निरीक्षक यांच्या समोर स्थानिक स्वयंघोषित राजकीय नेते व स्वयंघोषित पत्रकार यांचा पोलिस ठाण्यातील वावर कमी करणे, उरुळी कांचन पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कायदा-सुव्यवस्था कायम राखणे यासह गुन्हे अन्वेषण वाढविणे, असामाजिक तत्वांवर लगाम लावणे, जनसामान्यांमध्ये पोलिसांची प्रतिमा मलीन न होऊ देणे, पोलिस ठाण्याच्या नवीन जागेसाठी पाठपुरावा करणे या सर्व बाबींचे मोठे आव्हान असणार आहे. सोबतच सायबर क्राईम, पोलिस ठाण्याच्या हद्दीतील किरकोळ दुकानदारांकडून खंडणी वसुली यासह स्ट्रीट क्राईमकडेही वांगडे यांना लक्ष द्यावे लागणार आहे.
चोरांना उरली नाही पोलिसांची भीती…
चोऱ्यांच्या घटनांत दिवसेंदिवस वाढ होत चालली असून त्यामुळे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. रात्री-अपरात्री बिनधास्त चोर गावात शिरून निर्भीडपणे चोऱ्या करत आहेत. घरांचे कडी-कोयंडे, खिडक्या उचकटून घरात घुसून ऐवज चोरून नेत आहेत. यामध्ये पोलीस यंत्रणा निश्चितच कमी पडत आहे. कोरेगाव मूळ, सोरतापवाडी या गावात तर मागील काही दिवसात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. अनेकदा झालेल्या चोऱ्यांची फिर्याद देखील पोलीस चौकीला येत नसल्याने चोरांचे चांगलेच फावले आहे. अनेक मूल्यवान वस्तू आणि ऐवज चोरीला जात आहे, त्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत.
गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण अत्यल्प…
चोरी, घरफोडीसारख्या गुन्ह्याचे प्रमाण वाढले असले तरी असे गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण अत्यल्पच आहे. मागील दीड वर्षात झालेल्या गुन्ह्यांतील केवळ 2 जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. चोरी व घरफोडीत जवळपास लाखो रुपयांचा ऐवज चोरीस गेला असून यातील अत्यल्प प्रमाणात परत मिळाला आहे.
गुन्ह्याचा प्रकार, दाखल गुन्हे, उघड गुन्हे
खून – 1, 1, 1
खुनाचा प्रयत्न -7, 7, 7
जबरी चोरी -अंदाजे 25 ते 30, 25 ते 30, 2
चेन स्नाचिंग -3, 3 0
दरोडा – अंदाजे 3, 3, 3







