नागपूर: नंदनवन परिसरात केडीके कॉलेज रोडवर एका (Crime News) तरुणावर चाकूहल्ला करून त्याला (Nagpur News) ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गर्लफ्रेण्डने अबोला धरून दुसऱ्या तरुणाशी बोलणे सुरू केल्याने संतापलेल्या माजी प्रियकराने आपल्या साथीदारांसह हा हल्ला केला. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. जखमी तरुणाचे नाव नॅव्ही, वय 21 वर्षे असे असून, हल्लेखोरांची नावे संकेत वंजारी, वैभव तान्नेलवार आणि त्यांचे दोन साथीदार अशी आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नॅव्ही हा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रथम वर्षात शिकतो. संकेतही शिक्षण घेत आहे. रिया (नाव बदललेले) ही तरुणी काही काळ संकेतची गर्लफ्रेण्ड होती. मात्र, सहा महिन्यांपूर्वी तिने संकेतशी अबोला धरला आणि नॅव्हीसोबत बोलू लागली. यामुळे संकेत नाराज होता. सोमवारी रात्री सुमारे 10 वाजता नॅव्ही आणि रिया मोबाइलवर बोलत होते. तेव्हा संकेतने रियाच्या मोबाइलवर फोन केला. रियाने फोन कॉन्फरन्सवर जोडला असता संकेतने नॅव्हीला शिवीगाळ केली. त्यानंतर वैभवनेही धमक्या दिल्या.
यावेळी नॅव्हीने फोन बंद केला आणि मित्र राज व अंशुलसोबत केडीके कॉलेज रोडवरील झिलपे डेकोरेशनजवळ उभा होता. थोड्या वेळाने संकेत व त्याचे दोन साथीदार मोटारसायकलवर येऊन नॅव्हीला शिवीगाळ करत मारहाण केली. त्यानंतर वैभवही आला. त्यानेही मारहाण करत खिशातून चाकू काढून संकेतला दिला आणि नॅव्हीला मारून टाकण्यास प्रवृत्त केले. संकेतने नॅव्हीच्या गळ्यावर वार केला. नॅव्हीचे मित्र मदतीला आले असता त्यांनाही मारहाण करण्यात आली.
नॅव्हीच्या आरडाओरडीनंतर परिसरातील नागरिक धावून आले. ते पाहून हल्लेखोर पळून गेले. त्यानंतर नॅव्ही मित्रांसह नंदनवन पोलिस ठाण्यात पोहोचला. पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. नॅव्हीच्या तक्रारीवरून प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.






