उरुळी कांचन, ता. 02: उन्नती कन्या विद्यालयात (Uruli Kanchan) राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ‘इंटिग्रेटेड एक्झिबिशन फॉर होलेस्टिक एज्युकेशन’ या थीमअंतर्गत विद्यार्थिनींनी आपल्या सर्वांगीण विकासाचे दर्शन घडवले. शारीरिक, मानसिक, भावनिक व सामाजिक दृष्टीने शाळेच्या मुख्याध्यापिका पद्मादेवी विडप यांच्या संकल्पनेतून संचालिका नयॉन सुरेश कांचन व अध्यक्षा डॉ. नुपूर सुरेश कांचन यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून एमआयटी स्कूल ऑफ एज्युकेशन अँड रिसर्चच्या प्रोफेसर डॉ. दिव्या नायर उपस्थित होत्या. विद्यार्थिनींच्या अभ्यासक्रमातील विज्ञान प्रकल्प, मराठी राजभाषा दिनाच्या विषयाचे तसेच विविध इतर शैक्षणिक प्रकल्पांनी शाळेतील प्रत्येक कोपरा सजवला.
विद्यार्थिनींच्या विज्ञान प्रयोगांचे प्रदर्शन आणि वैज्ञानिक प्रात्यक्षिकांमुळे बालवैज्ञानिकांची जिज्ञासा उजागर झाली. याशिवाय मनोरंजक विज्ञान दालन, गणितीय संकल्पना स्पष्ट करणारे दालन, हिंदी व मराठी भाषेवरील प्रकल्प आणि आपल्या सणांचे महत्त्व दर्शवणारे प्रदर्शन या सर्वांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली. आर्ट अँड क्राफ्ट विभागात चिमुकल्यांनी साकारलेल्या कलात्मक चित्र व वस्तू पाहुण्यांना आकर्षित करीत होत्या.
विद्यार्थिनींच्या सृजनशीलतेला वाव देणारे हे सर्व प्रकल्प मोठ्या उत्साहाने सादर केले गेले. प्रत्येक प्रकल्पाबद्दल विद्यार्थिनींनी प्रेक्षकांना थेट माहिती दिली, ज्यामुळे पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विज्ञान शिक्षिका संयोजिता मुगळे आणि इतर विषय शिक्षकांचे मार्गदर्शन यशस्वी ठरले.
दरम्यान, शाळेच्या या आगळ्यावेगळ्या विज्ञान दिन उत्सवाने सर्वसमावेशक एकात्मिक शिक्षणाचे महत्त्व पालकांसमोर प्रभावीपणे मांडले आणि विद्यार्थिनींमध्ये सृजनशीलता व आत्मविश्वास वाढवण्यास मदत केली.







